गुळाचा एक खडा

विद्या शिगवण

पूर्वी घरी आलेल्या पाहुण्याला गूळपाणी देण्याची पद्धत होती. पूर्वी म्हणजे हे चहाचे प्रस्थ माजण्यापूर्वी. आता तर काय आल्यागेल्यालाच नव्हे तर घरातल्यालांनाही सकाळी उठल्याबरोबरच नाही, तर अगदी घडोघडी चहा लागतो. घरातही चहा लागतो आणि बाहेर पडल्यानंतरही चहा लागतो. कामावर असताना लागतो आणि फिरायला वा मित्रमंडळींकडे वा नातेवाईकांकडे गेल्यावरही लागतो.

पण खरे पाहिले तर चहाच्या कपापेक्षा गुळाचा एक छोटासा खडा आणि पेलाभर पाणी हे कितीतरी चांगले, आरोग्यदायी. पण आपण त्याला दूर लोटले आहे. चहाचे आणि खास करून साखरेचे इतके तोटे सांगितले जात असूनही, साखरेला पांढरे विष असे नाव दिले जाऊनही लोकांना असलेला साखरेचा मोह काही सुटत नाही.

पूर्वीची गूळ-खडा देण्याची पद्धत किती आणि कशी चांगली होती याबाबत सांगायचे, तर…
गुळाची चव मधुर आहेच, पण तो आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे. गूळ खाण्याने गोडी येण्याबरोबर बऱ्याच रोगांपासून मुक्तीदेखील मिळते. आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेल, की घरातील मोठी-वृद्ध माणसे दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर गुळाचा एक खडा तोंडात टाकून त्यावर पाणी प्यायची. याचे कारण गुळामध्ये अनेक आरोग्य लाभ आहे. त्यामुळे ती आपल्याला देखील गूळ खाण्याचा सल्ला देत असतात. नियमितपणे गूळ खाल्ल्याने मासिक पाळी, गुडघे दुखणे आणि दमा यांपासून आराम मिळतो. आपण खूप थकलेले असाल, त्या दिवशी पाण्याबरोबर गुळाचा एक खडा सेवन करा आणि त्याचा परिणाम बघा.

पाण्याबरोबर गुळाचा खडा खाण्याचे फायदे आहेत, तसेच, किंबहुना त्यापेक्षाधी किती तरी अधिक फायदे दुधाबरोबर गूळ खाण्याचे आहेत. पाहा-

गूळ रक्ताचे शुद्धीकरण करतो – गूळ रक्त शुद्ध करतो. त्यासाठी दररोज आपल्या आहारात गुळाचा समावेश करा.

गूळ पोटाचे त्रास कमी करतो- पचन संबंधित सर्व समस्यांना गूळ खाऊन दूर करू शकता.
गूळ गुडघ्यांचा त्रास कमी करतो – नियमित गूळ खाल्ल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. दररोज आल्याच्या एका लहान तुकड्याबरोबर गूळ मिसळून खाल्ले असता गुडघे मजबूत होतात. गुडघेदुखी कमी होते.

गूळ त्वचा तजेलदार करतो – नियमित गूळ खाल्ल्यामुळे त्वचा कोमल आणि निरोगी बनते. केसदेखील चांगले होतात. त्याचबरोबर मुरुमांचा त्रास कमी होतो.

मासिक पाळीच्या वेदना कमी होतात – ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात वेदना होतात, त्यांनी अवश्‍य गूळ खाल्ला पाहिजे. मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी साधारणपणे एक आठवडा आधीपासून दररोज 1 चमचाभर गुळाचे सेवन करणे लाभदायक असते.
गर्भावस्थेत ऍनिमिया होत नाही – गर्भवती महिलांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण नियमित गूळ खाल्ल्यामुळे त्यांना अशक्तपणा येत नाही आणि ऍनिमिया देखील होणार नाही.

गूळ नियमित खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात – दररोज एका ग्लास दुधात थोडा गूळ मिसळून प्यायल्याने स्नायू मजबूत होण्यास मदत होते. गूळ खाण्याने थकवा दूर होतो – दिवसातून तीन वेळा तीन चमचे गूळ दररोज खाल्ला असता थकवा दूर होतो.

गूळ दम्यातही लाभदायक आहे – जर दम्याचा होत त्रास असेल, तर गूळ आणि काळ्या तिळाचे लाडू बनवून घ्या. दररोज तिळ आणि गुळाचा एक लाडू खाऊन त्यावर एक ग्लास दूध घ्या.
नियमित गूळ खाण्याने लठ्ठपणा वाढत नाही – जर दूध किंवा चहामध्ये साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केला, तर लठ्ठपणा वाढत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)