वेध: सियाचीनपासून दमदार सुरुवात

मंदार चौधरी

भारताचे नवीन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचीन या जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीला नुकतीच भेट दिली.विविध अंगांनी ही भेट भारताच्या संरक्षणात्मक भविष्यासाठी महत्त्वाची ठरते. संरक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची कोणत्याही ठिकाणाला दिलेली ही पहिलीच भेट असल्याने सुद्धा हिचे एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे या भेटीतून अनेक संदेश निघतात. या भेटीनंतर भारतीय संरक्षणमंत्री म्हणून एक जबाबदारी त्यांनी पहिल्याच दिवशी अंगावर घेतली असल्याचे दिसत आहे.

सियाचीन भागावर किती प्रतिकूल परिस्थिती आहे हे भारतासह संपूर्ण जगाला माहिती आहे.एक प्रतीकात्मक म्हणून हा भाग भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच भारतीय सैन्याला इतक्‍या कठीण संकटांचा सामना करावा लागत असतानाही भारत याबाबतीत नरमाईने कधीच वागत नाही. संरक्षणमंत्री यांचे कार्यालय हे फक्‍त कार्यालय नसून ती एक संस्था आहे. संपूर्ण भारताच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या तिन्ही सैन्य दलांवर आहे त्या सेनेचे कमांड म्हणजे संरक्षण मंत्रालय. त्यामुळे कामाच्या पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष सियाचीनला जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन राजनाथ सिंहांनी एक प्रकारे हेच सिद्ध केले आहे की, त्यांच्या कामाचा धडाका कसा असणार आहे.

अतिशय कमी तापमान आणि समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी असलेल्या या भागात गोठवणारी थंडी असते. आज आपल्याकडे तंत्रज्ञान सर्वोच्च असूनही जे काही मनुष्यहानीचे संकट आहे ते कमी करण्यात अजून पूर्णपणे यश आलेले नाही. यासाठी दीर्घकालीन नियोजन भारताला करावे लागणार आहेत. जर तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सुयोग्य संवाद यंत्रणा आणि वैद्यकीय सुविधा वेळेत मिळवून देण्यात आपण यशस्वी ठरलो तर अशा गोठवणाऱ्या थंडीपासून जवानांचे नक्‍कीच संरक्षण करता येईल.

राजनाथ सिंह यांनी भेट दिल्यानंतर आपल्या भावना त्यांच्या ट्विटर अकाउंटद्वारे व्यक्‍त केल्या. त्यांनी ट्विटमध्ये सियाचीनमध्ये कार्यरत असणाऱ्या सैनिकांच्या पालकांचे ऋण व्यक्‍त केले. “धन्य आहेत ते पालक जी त्यांच्या मुलांबाळांना इतक्‍या प्रतिकूल परिस्थितीत फक्‍त देशाची सेवा करायला पाठवतात’, असे त्यांनी ट्विट केले आहे. याबरोबरच उत्तर-पूर्वेतले काही भाग महत्त्वाचे आहेत, पण हेही तितकेच महत्त्वाचे आहे की, सियाचीनचे जास्त महत्त्व आहे. या भागात पाकिस्तानची वारंवार घुसखोरी चालू असते आणि हा प्रांत भौगोलिकरित्या अशक्‍य असल्याने दोन्ही बाजूकडच्या सैन्यांना लढायला तितकाच कठीण आहे.

पाकने बऱ्याच वेळेस या सियाचीनच्या पोस्ट काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार करत असतात. म्हणून भारतीय सैन्याने सदैव रक्षात्मक पावित्र्यात राहणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व कारवायांमध्ये भारतीय वायुसेना तितकीच महत्त्वाची कामगिरी बजावते. सियाचीनमध्ये उभे राहून सीमेचे संरक्षण करणे, गुजरातच्या कच्छचे रण, राजस्थानच्या वाळवंटापासून ते या उच्च शिखरापर्यंत संपूर्ण सीमेचे संरक्षण करणे सैन्यासाठी बारमाही धोकादायक असलेले तरी ते कर्तव्य बजावत असतात.

भारतासाठी सियाचीनची भौगोलिक पार्श्‍वभूमी समाधानकारक नाही. सैन्याला या संरक्षणाच्या कामात सर्वात जास्त मदत होते ती भारतीय वायुसेनेची. एकवीस हजार ते बावीस हजार फूट उंचीवर चांगले वातावरण नसताना लढाऊ विमान व मालवाहू विमान उडवणे हा काही थट्टाबाजीचा खेळ नाही. वायुसेनेचे सर्व वैमानिक असामान्य आहेत. 25 ते 30 वर्षांपासून भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांनी बजावलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार मध्ये पूर्ण पाच वर्षे पूर्णवेळ संरक्षण मंत्री नव्हते. संरक्षणासारखे महत्त्वाचे खाते कुणाकडे तरी अतिरिक्‍त कारभार म्हणून देणे हे तितकेस शोभत नाही. जवळपास दहा लाखांहून अधिक असलेल्या भारतीय सैन्य यंत्रणेला सांभाळायला मंत्री पूर्णवेळ हवाच. आता राजनाथ सिंह यांच्या रूपाने एक योग्य व्यक्‍ती आली आहे. राजनाथ सिंह यांना या पदाचा कारभार चालवताना आधीच्या सरकारातील त्यांच्या गृहमंत्रिपदाचा अनुभव कामी येणार आहे.

भारतीय सैन्याला सध्या आधुनिक होण्याची गरज आहे.वायुसेनेसाठी राफेलचा मुद्दा लांबणीवर पडला आहे त्याचे निरसन लवकर व्हायला हवे. भारतीय पाणबुड्यांच्या करारात उशीर होत आहे तो आता अत्युच्च तंत्रज्ञानयुक्‍त पाणबुड्या नौसेनेला उपलब्ध करून देऊन टाळता यायला हवा. या सर्व समस्यांचे मूळ आहे निधी.त्यामुळे हाती पुरेसा निधी असल्याशिवाय ठोस पावले उचलणे कठीण असते. बजेटमध्ये संरक्षणासाठी अल्पशी तरतूद असते. याच निधीतून सेनेला सांभाळायला कष्ट पडतात तर सैन्याच्या आधुनिकीकरणाचे काम थोडे जिकिरीचे होते.

जगातल्या बहुतांश यशस्वी लोकशाहीमध्ये एक साधारण तत्त्व आहे की, एखाद्या क्षेत्रात मूलभूत बदल करायचा असल्यास तो बदल वरच्या सरकारी पातळीवरून खालच्या सरकारी पातळीपर्यंत पाझरत राहावा लागतो. भारतीय सैन्याच्या बाबतीत जर हे तत्त्व लागू करायचे झाले तर दोनच संस्था अशा आहेत की, ज्यांनी जर मनावर घेतले तर भारतीय सैन्याचा कायापालट आधुनिकरित्या म्हणण्यानुसार होऊ शकतो. त्या संस्था म्हणजे पंतप्रधान व सीएसएस (कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्‍युरिटी). आपण एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. त्यामुळे जबाबदारीने वागण्याबरोबरच नवीन संरक्षणमंत्र्यांनी भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाकडेही लक्ष पुरवायचे आहे.
सियाचीनला प्रत्यक्ष भेट देऊन राजनाथसिंह यांनी नक्‍कीच विश्‍वासाचे पाऊल उचलले आहे.वाजपेयी सरकारच्या काळातही जॉर्ज फर्नांडिस अशाच भेटी देत होते. त्यामुळे सैन्यात एक विश्‍वास कायम राहतो आपल्या नेत्याविषयी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)