#स्मरण: रविवारची-सूर्यनारायणाची कहाणी 

योगिता जगदाळे
आषाढ महिना संपत आला आहे. लवकरच श्रावण सुरू होईल. श्रावण हा सणावारांचा, उपवास-व्रतांचा, कहाण्यांचा महिना. श्रावण म्हटले की सर्वप्रथम आठवते ती बालकवींची श्रावणमासी हर्ष मानसी ही कविता. श्रावण महिना सुरू झाला, की सुरू होतात उपवास. श्रावणातील सोमवार, गुरुवार, आणि शनिवार करणारे पुष्कळ जण असतात. मी देखील श्रावणात उपवास करते, पण फक्त एकच. श्रावणी रविवार. रविवार हा सूर्याचा वार म्हणून माझा आवडता आहे. उपवासापेक्षा मला कहाण्यांचे अप्रूप मोठे. पूर्वी श्रावणात दररोज कहाणी ऐकायला मिळायची.
बाकी सगळे बरोबर असले, तरी उपवासाचे आंणि माझे कधी फारसे जमले नाही. आताही जमत नाही. श्रावण महिन्यात मी फक्त रविवार करते. एकच उपवास. बाकी उपवास हा प्रकार मला परवडतच नाही. सकाळ्चे दहा नाही वाजले तर मला भूक लागते. पोटात नुसते कावळे कोकलू लागतात. मात्र उपवास केले नाही, तरी मला श्रावण महिन्यातील कहाण्या ऐकायला फार आवडायचे. लहानपणी मी शेजारच्या आजींच्या घरी त्यासाठी संध्याक़ाळची जात असे. श्रावणात त्या दररोज एक कहाणी सांगायच्या. कधी कधी तर दोन तीन कहाण्या ऐकायला मिळायच्या त्यांच्याकडून. सांजवेळी देवघरात सर्व मुलांच्या घोळक्‍यात बसून आजीच्या प्रेमळ आवाजातील कहाण्या ऐकण्याचा आनंद आगळाच होता. (आता मी पुस्तकातील कहाण्या वाचते, माझ्या मुलीला श्रावणीला ऐकायला लावते. श्रावणाच्या आवडीने माझ्या मुलीचे नावही मी श्रावणीच ठेवले आहे.)
कहाणी कोणतीही असो. तिची सुरुवात आणि शेवट एकसारखा असायचा. आटपाट नगर होते. त्यात एक राजा राज्य करत होता…. अशी काही तरी सुरुवात असायची आणि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल होवो. आणि त्या कहाणीतील राजा, राणी वा कोणी गरीब- जो कोणी असेल त्याला जसा तो देव/देवी प्रसन्न झाला/झाली तसे तुम्हा आम्हालाही होवो असा त्याचा शेवट असायचा. संध्याकाळच्या वेळी देवघरात साऱ्या मुलांबरोबर बसून आजींच्या आवाजातील कहाणी ऐकायची आणि त्यानंतर तिने दिलेली खडीसाखर तोंडात टाकायची आणि घरी परत यायचे असा तेव्हा श्रावणातील संध्याक़ाळचा दिनक्रम असायचा. इतर साऱ्या कहाण्या ऐकल्या, तरी मला रविवारच्या कहाणीचे मोठे अप्रूप असायचे.
एक तर शंकर, विष्णू, मारुती, लक्ष्मी, अशा अनेक देवदेवतांच्या कहाण्या ऐकल्या तरी सूर्याची कहाणी मात्र फार कमी वेऴा ऐकली होती. आजीच्या तोंडून ती कहाणी ऐकताना मोठा आनंद वाटत असे. मुळात सूर्यदेवाची कहाणी ही आदित्य राणूबाईची कहाणी या नावाने पुस्तकात होती. तेव्हा सूर्याला आदित्यराणूबाई असे का म्हणतात असा प्रश्‍न माझ्या मनात उभा राहत असे. पण मी कधी तसे आजीला विचारले नाही. ऐका ऐका आदित्य राणूबाई अशी त्या कहाणीची सुरुवात असायची. त्या कहाणीतही राजा-राणी, प्रधान…सारे असायचे.
आपली कहाणी न ऐकणाऱ्याला सूर्यदेव कशी शिक्षा देतो याची मला मोठी गंमत वाटायची, खरं तर दैव देते कर्म नेते असेच नाव त्या कहाणीला जास्त शोभले असते. कारण कोहळ्यात भरून दिलेल्या मोहरा सूर्यदेव माळ्याच्या रूपाने येऊन काढून घेतो. काठी पोखरून त्यात भरलेले धन सूर्य नारायण गुराख्याच्या रूपाने येतो आणि काठी घेऊन जातो. नारळात भरून दिलेले धन नारळ्‌ नदीत पडून नष्ट होते. शिदोरीत घालून दिलेले धन घार झेप घालून घेऊन जाते, अशा प्रकारे सूर्याच्या कोपाने मिळालेले धन नाहिसे होते, आणि दारिद्रय काही नष्ट होत नाही. शेवटी सूर्यनारायण प्रसन्न होतो, तेव्हाच चांगले दिवस येतात.
कहाणीच्या शेवटी राजाच्या राणीला जसा सूर्य नारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये. अशी प्रार्थना करून बाकीच्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाल तसा तुम्हा आम्हाला होवो असा शेवट असायचा, आणि खरंच आहे. सूर्य नारायण प्रसन्न झाला, तरच जीवन जगेल. खऱ्या अर्थाने सूर्य जीवनदाता आहे. सूर्याविना जीवनाची कल्पना तरी करू शकतो का आपण ?
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)