वाहनचालकांना जाच! एसएनडीटी उड्डाणपूल परिसरातून “प्रवास नको’ची भावना

मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद, वाहनांच्या रोजच रांगा


मेट्रोचे कर्मचारी, ट्रॅफिक वॉर्डनच सोडवितात वाहतूक कोंडी

पुणे – कर्वेरस्त्यावरील नळस्टॉप चौकात मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. याठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. कर्वेरस्ता आणि पौडरस्ता एसएनडीटी उड्डाणपुलाच्या खाली एकत्र येतात. पर्यायाने या दोन्ही रस्त्यावरील वाहने एसएनडीटी उड्डाणपूल येथे एकत्र येत असल्याने याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. एसएनडीटी कॅनॉल रस्ता ते पौड फाटा अशी सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. ही परिस्थिती रोजचीच झाल्याने या वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

“वाहतूक कोंडीच्या सततच्या त्रासामुळे या रस्त्यावरून प्रवासच नको,’ अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी हा नेहमीच विषय झाला. मेट्रोचे काम सुरू होण्याच्या अगोदरपासून याठिकाणी सकाळच्या आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. या समस्येवर उपाय करण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध पर्याय अवलंबिण्यात आले. मात्र वाहतूक कोंडीच्या समस्या दूर करण्यात यश आले नाही.

वनाज ते शिवाजीनगर अशा मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. आता प्रत्यक्ष नळस्टॉप चौकात मेट्रोचे खांब उभारण्याचे तसेच मेट्रो स्टेशनचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे याठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

पूर्वी वन-वे (एकेरी मार्ग) असलेला एसएनडीटी उड्डाणपुलावरून आता दुहेरी वाहतूक करण्यात आली आहे. या पुलावरून डेक्कनला तसेच कोथरूडकडे वाहने जातात. तर लॉ कॉलेज रस्त्यावरून तसेच डेक्कनवरून येणारी वाहने नळस्टॉप चौक एकत्र येतात. नळस्टॉप चौक ते एसएनडीटी कॉलेज या मार्गावरसुद्धा एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. डेक्कनवरूनही येणारी वाहने एसएनडीटीसमोरील पादचारी पुलाच्या खाली एकत्र येतात. येथेही वाहतूक कोंडी होते. पर्यायाने नळस्टॉपपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सायंकाळी दिसते.

पोलिसांसाठी पावत्या फाडणे महत्त्वाचे…
वाहतूक कोंडी होत असली, तरी पौड फाटा येथील पोलीस स्टेशनच्या बाहेर वाहतूक पोलीस पावत्या फाडण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. अखेर वाहतूक कोंडीची समस्या याठिकाणी मोठी होऊ लागल्याने आता पोलीस रस्त्यावर दिसू लागले आहे. एसएनडीटीच्या उड्डाणपुलाखाली मेट्रोचे कर्मचारी आणि ट्रॅफिक वॉर्डन हे वाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावत असल्याचे चित्र आहे.

गल्ली-बोळांतील रस्तेही जाम
नळस्टॉप चौक आणि पौड फाटा या दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक अन्य रस्त्याचा वापर करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे या परिसरातील गल्ली-बोळांतील रस्त्यांवर सुद्धा वर्दळ दिसून येते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here