महिनाभरात थकीत देणी ही मिळणार
जिल्हाधिकारी, एसपींच्या पुढाकराने निघाला तोडगा
सातारा – कोल्हापूर व सांगलीप्रमाणे आता सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एक रक्कमी एफआरपीप्रमाणे दर मिळणार आहे. त्याच बरोबर येत्या काळात साखरेचे दर 3400 रूपयांपर्यत गेल्यास अधिकचे दोनशे रूपये देखील देण्यात येणार असून मागील हंगामातील थकीत देणी महिनाभराच्या आत देण्याचे कारखानदारांनी मान्य केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सकाळी जिल्ह्यात आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालर्यात साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान, बैठकीच्या सुरूवातीलाच साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांनी एक रक्कमी एफआरपी देण्याचे व साखरेचे दर वाढल्यास अधिक दर देखील देवू असे जाहीर करून टाकले. मात्र, यानंतर जिल्ह्यातील अनेक कारखानदारांनी मागील हंगामातील देणी दिले नसल्याचा मुद्दा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडला. जरंडेश्वर कारखान्याने मागील हंगामात प्रति टन 2900 रूपये दर जाहीर करून पुर्ण रक्कम अदा केली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर जरंडेश्वरच्या प्रतिनिधींनी येत्या 4 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांपुढे म्हणने सादर करण्याचे आश्वासन दिले. तर किसनवीर कारखान्याने पैसे उपलब्ध होताच देणी देण्याचे मान्य केले. तर स्वराज व रयत कारखान्याने येत्या 30 दिवसांच्या आत थकीत देणी देण्याचे मान्य केले.
स्वाभिमानीचे सचिन नलवडे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या ऊसतोडीचा कार्यक्रम गावनिहाय लावण्यात यावा तसेच कारखान्यांचे वजन काटे अचानकपणे तपासण्यात यावेत अशी मागणी केली. रयत क्रांती संघटनेचे संजय भगत यांनी कारखानदारांच्या गलथान कारभारामुळे आता ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा कारभारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच राजू शेळके यांनी वर्धन ऍग्रोने गाळप परवाना न घेताच कारखाना सुरू केला असून मागील हंगामात जाहीर केल्याप्रमाणे दर दिला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी, जे कारखाने नियम मोडतील त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा यावेळी दिला.
हिंदकेसरीशी कसे लढणार
दरम्यान, यावेळी स्वाभिमानीचे अनिल पवार यांनी मागणी लावून धरल्यानंतर प्रत्येक कारखान्यांच्या प्रतिनिधींनी एफआरपीप्रमाणे द्यायची रक्कम जाहीर केली. मात्र, खटाव तालुक्यातील वर्धन ऍग्रोच्या प्रतिनिधींने आमचे युनिट नवीन असून शेजारील कारखान्यांप्रमाणे दर देवू असे सांगितले. त्यावर काही जणांनी सह्याद्रि प्रमाणे दर देणार का, असे विचारताच त्यांनी आम्ही हिंदकेसरीशी कसे लढणार, असा सवाल उपस्थित केला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा