बेकायदेशीर वाहतूक ः पोलीस, पीएमपी पथकाची कारवाई
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेली अवैध प्रवासी वाहतूक आणि त्यामुळे पीएमपीच्या बसला सातत्याने होत असलेला तोटा रोखण्यासाठी आता पीएमपी प्रशासानाने वाहतूक पोलिसांची मदत घेतली आहे. पीएमपी विभाग व पिंपरी वाहतूक पोलिसांनी पथकाची स्थापना करुन अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांची अवैध वाहतूक करण्यामध्ये विविध कंपन्यांच्या खाजगी बसचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पहिल्यांदा झालेल्या कारवाईत दोन खाजगी कंपन्याच्या बस आणि तीन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. खाजगी कंपनीच्या गाड्यामधून प्रवाशी वाहतूक केल्याप्रकरणी पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू आहे.रिक्षाचालक तसेच इतर वाहनांमधूनही खुलेआम पीएमपी थांब्याजवळ जाऊन प्रवासी घेण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर पीएमपीने वाहतूक पोलिसांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे साकडे घातले. वाहतूक पोलिसांनीही याला प्रतिसाद देत पीएमपीला सोबत घेऊन कारवाई सुरूवात केली आहे. सोमवारी या पथकाने केलेल्या कारवाईत दोन खासगी कंपन्यांच्या बस अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यानंतर या बसवर कारवाई करण्यात आली.