तामकडे जळीतग्रस्तांना मदतीचा हात

कराड – पाटण तालुक्‍यातील तामकडे येथे बुधवारी खळ्याचा माळ नावाच्या शिवारात जनावरांच्या शेडला अचानक लागलेल्या आगीत तब्बल 5 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर 6 जनावरे आगीत होरपळली आहेत. या आगीत राजाराम बापू पवार या शेतकऱ्याचे सुमारे 8 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी याठिकाणी भेट देत पवार कुटुंबियांना दिलासा देत शासकीय व वैयक्तीक पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

तामकडे येथील राजाराम बापू पवार यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या खळ्याचे माळरान नावाच्या शिवारात जनावरांचे शेड आहे. या शेडमध्ये दोन गाभण म्हशी, दोन गाई, तीन बैल, रेडकू, वासरू अशी एकूण अकरा जनावरे बांधलेली होती. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या शेडला अचानक आग लागल्याने सर्वांचीच पळापळ झाली. दुपारची वेळ असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने सदरचे शेड जळून खाक झाले. या आगीत सुमारे 5 जनावरांचा अक्षरश: होरपळून मृत्यू झाला. तर इतर 6 जनावरे 90 टक्‍के पेक्षाही जास्त भाजलेली असून ती अतिशय गंभीर अवस्थेत आहेत. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत.

आग लागल्यानंतर काही जनावरे बांधलेले दावे तोडून संपूर्ण माळरानात सैरभैर पळत सुटली. हा सर्व प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. काही ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला कळविल्यामुळे अग्निशमन दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी पोहचल्याने या भीषण आगीवर नियंत्रण मिळविता आले. या आगीची माहिती समजताच महसूल व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. या आगीत 8 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

जनावरांचा आधार तुटला…

आपल्या जीवाच्या पलीकडे जपलेल्या बैलांच्या जीवावर शेतीबरोबर इतरांच्या शेती मशागतीची कामे करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या राजाराम पवार यांच्या कुटुंबाला जनावरांचा मोठा आधार होता. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हातांनी मदत करणे अपेक्षित आहे. बाधित शेतकऱ्याला फूल ना फुलाची पाकळी देऊन त्यांचा संसार पुन्हा रुळावर आणण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मदतीचा ओघ सुरू

पाटण तालुक्‍यातील जोतिबावाडी येथील येराडचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळाकडून शेतकरी राजाराम पवार यांना रोख 10 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. तसेच तामकडे गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन संपूर्ण गावामधून 20 हजार रुपये गोळा करून पवार यांना मदत देण्यात आली.

उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

राजाराम बापू पवार या जळीतग्रस्त शेतकऱ्याचा उदरनिर्वाहाचे पशुपालन हे प्रमुख साधन होते. जनावरांचे शेडला लागलेल्या आगीत उदरनिर्वाहाचे साधनच पूर्णपणे खाक झाल्याने या कुटुंबापुढे आर्थिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. गत वर्षी मुलीच्या लग्नाचा खर्च डोक्‍यावर घेऊन पत्नी व तिसरीत शिकणाऱ्या मुलाला घेऊन कशीबशी गुजराण करणाऱ्या पवार यांचे पशुधन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)