- अश्लिल फोटो व्हायरल करुन केली बदनामी
पिंपरी – सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या मित्राला पती नसताना विवाहितेने घरी बोलावले. महिलेच्या घरी मुक्कामाला थांबल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, तिच्यासोबतचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर तसेच पतीच्या व्हॉटसऍपवर पाठवून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन बादशहा ऊर्फ रतीन गुप्ता (रा. सतनाम, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी गुप्ता यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. 22 मार्च रोजी आरोपी उत्तरप्रदेश येथून महिलेला भेटण्यासाठी आला होता. महिलेच्या घरी आल्यानंतर मध्यरात्री ते बोलत बसले असताना आरोपीने महिलेला “तुझ्या नवऱ्याने सोडल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेन’, असे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व दोघांनी एकत्र काढलेले फोटो हॅलो ऍपवर अपलोड केले व ते फोटो त्याने तिच्या पतीच्या व्हॉटसऍपवर पाठवून तिची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.