आंबीजळगावच्या मरीमाता जत्रेत भाविकांची गर्दी

कर्जत: तालुक्यातील आंबिजळगाव येथील जागृत देवस्थान मरिमातेची जत्रा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. जत्रेतील विशेष आकर्षण असलेला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रमही मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
सालाबादप्रमाणे यंदाही दर्श अमावस्येच्या दिवशी आंबिजळगाव येथील मरिमातेची जत्रेसाठी ग्रामस्थांच्या वतीने गावात मोठी तयारी करण्यात आली होती. जत्रेनिमित्त मंदिराचा परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सकाळपासून पंचक्रोषीतील भाविकांनी मरिमातेचे दर्शन तसेच नैवेद्य दाखविण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केली. सकाळी ११ वाजता मरिमातेची विधिवत पुजा, आरती करुन जलअभिषेक करण्यात आला. त्यानंतर मरिमातेची खणा-नारळाने ओटी भरुन सनई, हलगी व संबळांच्या गजरात पोशाख व अलंकार चढविण्यात आले. सुवासिनींनी मातेचे औक्षण केले. त्यानंतर मंदिरात सामुदायिक महाआरती झाली.
दरम्यान, देवीचे भगत विठोबा चव्हाण यांनी जत्रेतील पूर्वापारची परंपरा असलेला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी देवीचा आशीर्वाद घेत मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केली. सोबतच त्यांचे पुत्र बापु चव्हाण यांनी देवीचा नंदीसोबत घेत त्यालाही मंदिर प्रदक्षिणा घातली. त्यानंतर मंदिरापासून काही दूर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेसमोर उभ्या केलेल्या व दोरखंडाने एकत्र बांधलेल्या सर्व गाड्या ओढण्यासाठी प्रस्थान केले.
जत्रेचे मानकरी व गावचे पाटील शिवाजी दिनकर निकत यांना मान देत गाड्या ओढण्यास सुरुवात झाली. धान्य, लिंबू, अंडी, कुंकू, हळदीची मरिमातेच्या नावाने गाड्यांवर उधळण करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या ‘मरिमातेच्या नावानं चांगभलं, लक्ष्मीआईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने तसेच सनई, हलगी व संबळाच्या गजराने संपूर्ण परिसर भारावून गेला.
गावच्या प्रमुख रस्त्यावरुन विठोबा चव्हाण यांनी देवीच्या सर्व गाड्या मंदिरापर्यंत पोहोच केल्या. गाड्या ओढतांना सर्व गाड्यांमध्ये गावातील पुरुष, तरुणांसह चिमुकलेही उत्साहाने सहभागी झाले होते. मंदिर परिसरात नवस फेडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जत्रेची सांगता करण्यात आली. मंदिर परिसरात खेळणी, गृहोपयोगी वस्तू तसेच खाद्य पदार्थांची दुकाने थाटली होती. जत्रेत यावर्षी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)