पुणे – उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी नीरा पिण्याला अनेकांची पसंती असते. मात्र शिळी किंवा भेसळ केलेली निरा मिळाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील निरा विक्रेत्यांकडील नीरेचे नमुने जमा करण्यात आले आहे. आरोग्यास अपायकारक किंवा भेसळयुक्त नीरा आणि सरबतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील 15 ठिकाणांहून नीरेचे नमुने जमा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरून नीरेचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सूचनांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बर्फ, आईस्क्रीम, थंड पेये यांची देखील नियमित तपासणी करण्यात येत असून उन्हाळा संपेपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. तसेच विनापरवाना नीरा विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.