नवी दिल्ली – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गावरील वनाखाली असलेली 77 हेक्टर जमीन दिली असून त्यामुळे तेथे आता वृक्ष तोड होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी देशातील 99 टक्के लोकांना या बुलेट ट्रेनचा उपयोग नाही असे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात कालच एका रेल्वेक्रॉसिंगवर शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला रेल्वेची धडक बसली त्यात 13 विद्यार्थी दगावले. त्यावरूनही निशाणा साधताना चिदंबरम यांनी आज अनेक ट्विटर संदेश प्रसारीत केले आहेत. त्यात त्यांनी या समस्या उपस्थित करून बुलेट ट्रेन काय कामाची असा सवाल उपस्थित केला आहे.
देशातील 99 टक्के प्रवाशांना या ट्रेनचा उपयोग नाही असेही त्यांनी म्हटले आहे. धोकादायक रेल्वेक्रॉसिंगवर होणारी जीवित हानी रोखण्याची उपाययोजना करण्याऐवजी मोदी सरकारने 1 लाख 8 हजार कोटी रूपयांच्या बुलेट ट्रेन रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्यासाठी 77 हेक्टर जागवरील वनक्षेत्र नाहीसे केले जाणार आहे याकडेही या ट्विट मध्ये चिदंबरम यांनी लोकांचे लक्ष वेधले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा