5 महिन्यांत 93 हजार टॅंकर फेऱ्या

पाणी असतानाही पुणेकरांना टॅंकरचाच आधार

पुणे – शहाराच्या पाणीकपातीवरून सुरू असलेल्या वादामुळे पुणेकरांचा घसा कोरडा पडला आहे, तरी पावसाळ्याच्या चार महिन्यांतही पुणेकरांना पाण्यासाठी टॅंकरचाच आधार घ्यावा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जून ते ऑक्‍टोबर 2018 या पाच महिन्यांत शहरात 93 हजार टॅंकर फेऱ्या झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वितरण व्यवस्थेतील पाणी गळती आणि नियोजनाच्या त्रुटींमुळे पुणेकरांना पाण्यासाठी पाणीपट्टी भरत असूनही या टॅंकरसाठी पुन्हा पाण्यावर पैसे मोजावे लागले आहेत. महापालिकेकडून ऑक्‍टोबरमध्ये कालवा समितीची बैठक होईपर्यंत शहरात 2 वेळा पाणीपुरवठा केला जात होता. त्यासाठी दरदिवशी पालिकेस 1,400 ते 1,500 एमएलडी पाणी खडकवासला धरणातून घ्यावे लागत होते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील काही मध्यवर्ती पेठा, कोथरूड आणि मुकुंदनगर तसेच महर्षिनगरमध्येच 2 वेळा पाणी दिले जात होते. तर उर्वरित शहरात एकवेळ पाणी होते. तर हडपसर, महमंदवाडी आणि काळेपडळच्या काही भागासह लोहगावात दिवसाआड पाणी सुरू होते. मात्र, या पाण्याच्या वितरणातही योग्य नियोजन होत नसल्याने शहरातील उपनगरांमध्ये पाण्यासाठी नागरिकांचे पावसाळ्यातही हाल सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत शहरात टॅंकरच्या सुमारे 92 हजार 997 टॅंकर फेऱ्या झाल्या आहे. शहरात गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारे भर पावसाळ्यात टॅंकरच्या 90 हजारांपेक्षा अधिक फेऱ्या झाल्या आहेत.

ऑक्‍टोबरमध्ये विक्रमी फेऱ्या
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्‍टोबरमध्ये गेल्या काही वर्षांत टॅंकरची विक्रमी मागणी झालेली आहे. 2015-16मध्ये ऑक्‍टोबरमध्ये 16 हजार, 2016-17 मध्ये 15 हजार, 2017-18 मध्ये 12 हजार टॅंकरची मागणी होती. 2018-19 मध्ये ही मागणी थेट 20 हजारांवर गेली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खडकवासला कालवा फुटल्यानंतर लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे टॅंकरची मागणी वाढल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)