91 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या; 38 जणांना बढत्या

पिंपरी – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याचे जाहीर होताच महापालिका प्रशासनाने रखडलेल्या बदल्या व पदोन्नतीचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या विविध विभागांमधील 91 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लेखाधिकारी, लेखापाल, भांडारपाल, मुख्य लिपिक, लिपिक, सर्व्हेअर, अनुरेख, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचा समावेश आहे.

याशिवाय आचारसंहितेची मर्यादा असल्याने 38 जणांच्या रखडलेल्या बढत्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये भांडारपाल, कार्यालयीन अधिक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि मुकादाम या पदांवर बढती देण्यात आली आहे. आयुक्‍तश्रावण हर्डीकर यांनी या बदल्या आणि बढत्या केल्या आहेत.

महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात वाद निर्माण होत असल्याने. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 मध्ये बदल्यांचे धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यानुसार एकाच विभागात सेवेचे सहा वर्ष पूर्ण केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच बढतीस पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आली आहे.

बांधकाम परवानगी, नगररचना विभागातील तीन “आरेखकां’ कर्मचाऱ्यांबरोबरच चार “सर्व्हेअर’च्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आठ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या बदल्या केल्या आहेत. सहा “अनुरेखकां’च्या बदल्या केल्या आहेत. नऊ लेखापाल, उपलेखापालांच्या बदल्या केल्या आहेत. सात मुख्य लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. तर, 39 लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. सहा भांडारपाल, सहाय्यक भांडारपालांच्या आणि नऊ लेखाधिकारी व लेखापाल अशा 91 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे. रुजू न झाल्यास, बदली आदेशाचा अवमान केल्यास तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्यात येईल. शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आचारसंहिता संपताच बदल्या, बढत्यांचा धडाका यांना मिळाली बढती राजीव घुले, रामकृष्ण आघाव, प्रभाकर शेलूकर आणि राजाराम सरगर यांना “कार्यालयीन अधीक्षक’पदावर बढती दिली आहे. शाम सारोक्‍ते आणि अनय म्हसे यांना ‘भांडारपाल’ पदावर बढती दिली आहे. आरोग्य निरीक्षक सलीम इनामदार, अभिजीत गुमास्ते यांना “मुख्य आरोग्य निरीक्षक’पदी बढती देण्यात आली आहे. त्याचबरोबर सफाई कामगार, मजूर, वॉर्ड बॉय, आया, सफाई सेवक, स्प्रेकुली, गटरकुली, कचराकुली अशा 30 जणांना “मुकादम’ पदावर बढती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)