900 बस खरेदीला “ग्रीन सिग्नल’

पिंपरी – प्रवाशांची संख्या लक्षात घेता, बस खरेदी करण्यास दोन वर्षांपूर्वी मान्यता देऊनही पीएमपीएमएलने अद्यापही बस खरेदी केल्या नाहीत. बस खरेदीकरिता पीएमपीएमएला निधी दिल्यास अन्य कारणांसाठी खर्च होण्याची शक्‍यता लक्षात घेत, महापालिकेला थेट पद्धतीने 900 बस खरेदी केल्या जाणार आहेत. यामध्ये 400 सीएनजी तर 500 इलेक्‍ट्रिक बसचा समावेश आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही खरेदी केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्‍टोबर महिन्याची तहकूब सभा बुधवारी (दि. 31) पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषय पत्रिकेवरील 13 विषय मंजूर करण्यात आले. एक विषय दफ्तरी दाखल करण्यात आला. तर, दोन विषय तहकूब करण्यात आले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात पीएमपीची बससेवा सुरू आहे. दोन्ही महापालिकांमध्ये पीएमपीसाठी बस खरेदी करण्याचे 60:40 असे प्रमाण ठरले आहे. त्याबाबतचा ठराव 23 ऑगस्ट 2016 रोजी झाला आहे. त्यानुसार 1550 बस खरेदी करण्याचे नियोजन आहे. यापैकी 550 वातानुकूलित बस केंद्र सरकार अंगीकृत असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग (एएसआरटीयु) संस्थेकडून घेण्यात येणार आहेत. दोन्ही महापालिकांमध्ये ठरलेल्या 60:40 धोरणानुसार 100 बस खरेदी करण्यात येणार आहेत. उर्वरित 900 बस महापालिकेने खरेदी करून पीएमपीला द्याव्यात, असा सदस्य प्रस्ताव स्थायी समितीने मान्य करुन महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. गेल्या दोन वर्षांत पीएमपीने केवळ 200 बस खरेदी केल्या आहेत. ही बाब सभागृहाच्या निर्शनास आणून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, बस खरेदीचा विषय सदस्य प्रस्तावाद्वारे मांडण्यात आला आहे. आयुक्त या प्रस्तावाची अंमलबजावणी करणार आहेत का? याची माहिती देण्याची मागणी केली. बस संख्येच्या निकषानुसार पिंपरी-चिंचवडकरांना बस उपलब्ध करुन दिले जात असल्याचे परिक्षण करण्याची मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली. यावर सदस्य प्रस्तावाच्या सर्व कायदेशीर बाजू तपासूनच त्याची अंमलबजावणी केली जाते, अशी माहिती आयुक्त हर्डीकर यांनी सभागृहाला दिली.

त्यामुळे थेट पद्धतीने बस खरेदी : पक्षनेते
महापालिकेच्या वतीने पीएमएपीएमएलला बस खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास त्याचा वापर कर्मचाऱ्यांचे वेतन अथवा बोनस देण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून ही बस खरेदी थेट पद्धतीने केली जाणार आहे. याशिवाय सदस्य प्रस्तावावर निर्णय घेण्याचा महापालिका आयुक्तांचा अधिकार आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सभागृहात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)