आमदार देसाई यांचा यशस्वी पाठपुरावा; 15 बोअर मारण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सणबूर – पाटण विधानसभा मतदारसंघात टंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई आराखड्यातील एकूण 31 नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे व 15 विंधन विहिरी मारण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. या कामांकरिता सुमारे 90 लाख 96 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील टंचाई परिस्थिती निवारण्याकरिता मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचा सातत्याचा पाठपुरावा यशस्वी झाला असून 31 नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे व 15 विंधन विहिरी मारण्याची कामे लवकरात लवकर सुरू करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी व आमदार शंभूराज देसाई यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची उद्भवलेल्या तीव्र टंचाई निवारणार्थ शासनामार्फत विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून यामध्ये टंचाईकाळात नादुरुस्त झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी मारणे, विहिरी खोल करून पेयजल स्त्रोत बळकटीकरण करणे या कामांचा त्यामध्ये समावेश आहे. आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रातांधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेकरिता पाठविला होता.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त झाले नव्हते. परंतु शासनाने टंचाईची परिस्थिती पाहता पाणीटंचाई संदर्भात लोकसभेची आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आराखड्यांना मंजुरी देणे तसेच मूलभूत गरजांची कामे सुरू करणे याकरिता शिथिलता देण्यात आल्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेवून पाणीटंचाई आराखड्यातील कामांना मंजुरी देण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी केली होती.
पाटणमधील नादुरुस्त झालेल्या 31 नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करणे तसेच आवश्यक त्या 15 ठिकाणी बोअर मारणे या कामांना मंजुरी दिली असल्याचे आदेश दिले आहेत. विशेष दुरुस्ती नळपाणी पुरवठा योजनांच्या कामांमध्ये मेंढेघर, कोंढावळे, मेंढेघर कदमवाडी, रिसवड नाव, कुसरुंड पवारवस्ती, सलतेवाडी बिबी, ठोमसे, कामरगाव, पाठवडे बाटेवाडी, पाठवडे बौध्दवस्ती, झाकडे बौध्दवस्ती, ढोकावळे नाव, आंब्रुळे, पाचगणी, गुरेघर, वायचळवाडी, चाळकेवाडी, जळव, मस्करवाडी, धनावडेवाडी निगडे, करपेवाडी काळगाव, सुपुगडेवाडी, भरुगडेवाडी मंद्रुळकोळे, चाफेर मुस्लिमवस्ती, शिंदेवाडी, गणेवाडी ठोमसे, शिद्रुकवाडी धावडे तर विहिर खोल करणे, गाळ काढणे व आडवी बोअर घेणे अंतर्गत सोनवडे, मुठ्ठलवाडी, बोडकेवाडी, बहुले, चाहुरवाडी नाणेगाव या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. तर विंधन विहिर डेरवण, कुंभारगाव माटेकरवाडी, मालोशी पाडेकरवाडी, मोरगिरी,सळवे कदमवस्ती, सळवे सदुवर्पेवाडी, तामिणे गावठाण, तामिणे बौध्दवस्ती, तामिणे जिल्हा परिषद शाळा, काळगाव लोटलेवाडी, काठी टेक, वाघजाईवाडी, विहे धुमाळवस्ती, तळीये पश्चिम सुतारवाडी, पाणेरी यमकरवस्ती या गावांचा समावेश आहे.पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन सदरच्या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्यात येऊन लवकरच सदरची कामे हाती घेण्यात यावीत असे आदेश दिले आहेत.
धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे
पाटण तालुक्यातील कोयना, मोरणा, तारळी, उत्तरमांड, वांग मराठवाडी व महिंद या धरणातीलपाणीसाठ्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच तालुक्यातील जनतेला पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची टंचाई काळातही योग्य सोय होऊ शकली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच तालुक्यात टंचाईची दाहकता कमी प्रमाणात जाणवली असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले.