नऊ लाख 34 हजारांची दारू जप्त

अवैध दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाईचे सत्र सुरू

नगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरु केले असून, आज (दि.19) जामखेड तालुका व परिसरात जोरदार कारवाई करून 9 लाख 34 हजार 324 रुपयांची दारू जप्त केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक पराग नवलकर यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्काचे उपअधीक्षक सी. पी. निकम यांच्या पथकाने जामखेड येथे सापळा रचवून इनोव्हा (क्र. एमएच- 43 एएफ- 2203) व दुचाकीमधून (क्र. एमएच- 16 एझेड- 9124) 9 लाख 34 हजार 324 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जामखेड तालुका व परिसरातील रामहरी सुभाष नरवडे (वय-23), अनिल रामदास जाधव (वय-30. दोघे रा. बीडसंगवी, ता. आष्टी, जि. बीड), सतीश विठ्ठल सूर्यवंशी (वय-33 रा. सरदवाडी ता. जामखेड, जि. अ.नगर) यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून देशीच्या 240 बाटल्या, ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या 72, मॅकडॅल रमच्या 48, मॅकडॉलच्या 48, इंप्रियलब्ल्यू व्हिस्कीच्या 12, तर टुबर्क बिअरच्या 36 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक ए. बी. बनकर, दुय्यम निरीक्षक बी. बी. हुलगे, सहाय्यक फौजदार सचिन वामने, भरत तांबट, अविनाश कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाभरात कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत दारूसह लाखो रुपयांची रक्कमही कारवाईत पकडण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)