सणबूर – राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 5 मोठ्या रस्त्यांच्या कामांना ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून एकूण 9 कोटी 95 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. शंभूराज देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पाटण मतदारसंघातील ग्रामीण व डोंगरी भागातील रस्त्यांच्या कामांना प्रतिवर्षाप्रमाणे सन 2019-20 मध्ये आवश्यक असणारा निधी मंजूर करण्याबाबत ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते.
या कामांना ना. मुंडे यांच्या सूचनेवरून ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या 5 रस्त्यांच्या कामांसाठी 9 कोटी 95 लाख 42 हजारांचा निधी मंजूर केला आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांमध्ये नाडोली पोहोच रस्ता, दिवशी बुद्रुक ते मारुलहवेली रस्ता, नावडी रस्ता, मणदुरे ते निवकणे रस्ता, वर्पेवाडी (गोकूळ तर्फ पाटण) या रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना लवकरच सुरुवात होईल असे पत्रकात म्हटले आहे.