9 डिसेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा

संग्रहित छायाचित्र

1 लाख 15 हजार विद्यार्थ्यांकडून अर्ज

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षा येत्या 9 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 1 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

2007-08 पासून महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते. इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते. दीड लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांनाच या परीक्षेला बसता येते. वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात येत असते.

आता येत्या 9 डिसेंबरला ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी 1 लाख 15 हजार 27 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. या परीक्षेसाठी एकूण दोन पेपर असणार आहेत. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपात ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणीचा पहिला पेपर होणार असून यात एकूण 90 प्रश्‍न व 90 गुण असतील. शालेय क्षमता चाचणीचा दुसरा पेपर होणार असून यातही 90 प्रश्‍न व 90 गुण असणार आहेत. प्रत्येकी एका पेपरसाठी दीड तासांची वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षेत किमान 40 टक्‍के गुण मिळविणारा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2019 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लावण्याचे नियोजनही केले आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण ठरणाऱ्या विद्यार्थ्याला इयत्ता 9 ते 12 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा एक हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र, ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला चारही शैक्षणिक वर्षांत किमान 55 टक्‍के गुण मिळविण्याचे बंधन कायम राहणार आहे.

अखिल भारतीय पातळीवर 1 लाख विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते. महाराष्ट्रातील 11 हजार 682 विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रामुख्याने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा खूप महत्त्वाची आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)