864 लाभार्थी “घरकुल’च्या प्रतिक्षेत

पिंपरी – महापालिकेच्या वतीने चिखली येथील घरकुल प्रकल्पातील सहा इमारती बांधून पुर्ण आहेत. मात्र, त्यातील घरांचे वाटप रखडले आहे. उर्वरीत 27 इमारतींचे कामही अपुर्ण असल्याने पात्र 864 लाभार्थी अद्याप घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत. केवळ ठेकेदाराला वाढीव दर मिळवून देण्यासाठी घरांचे वाटप केले जात नसल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकासाठी चिखली येथे घरकुल योजना राबविली आहे. 2008 पासून सुरू असलेली ही योजना अद्याप पुर्ण झालेली नाही. दहा वर्षात काही लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु, अनेक लाभार्थ्यांचे मागील दहा वर्षांपासून हक्‍काचे घर कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन कार्यालयात तसेच कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी वेगवेगळ्या बॅंकेत, शासनाचे विविध दाखले मिळविण्यासाठी तलाठी कार्यालय, नागरी सुविधा केंद्र, तहसिल कार्यालयासह इतर अनेक शासकीय कार्यालयात चकरा मारल्या. या कार्यालयांचे उंबरे झिजवल्यानंतर हे लाभार्थी पात्र ठरले आहेत. लाभार्थ्यांनी बॅंकेचे घेतलेले कर्ज देखील महापालिकेकडे जमा झाले आहे. घर ताब्यात नसतानाही कर्जाचे हाप्ते फेडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

घरकुल योजनेच्या फेज 1 मध्ये 6 इमारती दोन वर्षांपासून बांधून तयार आहेत. प्रशासनाकडून माहिती घेतली असता पवार-पाटकर ठेकेदारामार्फत हे काम पुर्ण करण्यात आले. काम पुर्ण असूनही या इमारतीतील घरांचे वाटप न केल्याने त्यांचा गैरवापर होत आहे. येथील स्वच्छतागृहांचा बेकायदेशीर वापर केला जातो. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. खिडक्‍यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. येथील स्टील व इतर साहित्य चोरीला गेले आहे. बांधकाम पुर्णत्वाचा दाखला न मिळाल्याने घरांचे वाटप करता येत नसल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ठेकेदाराला पोसण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख यांनी केला आहे. येत्या आठ दिवसांत घरांचे वाटप न केल्यास लाभार्थ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

27 इमारतींचे काम अपुर्ण
घरकुल प्रकल्पातील एकूण 52 इमारतींपैकी केवळ 25 इमारतींमधील घरांचे वाटप झाले आहे. 6 इमारतींचे काम पुर्ण झाले आहे. मात्र, त्यातील घरांचे वाटप रखडले आहे. 27 इमारतींचे काम अद्याप अपुर्ण आहे. ठेकेदाराला दर वाढवून देण्यासाठी घरांच्या वाटपात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख यांनी केला आहे. याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत घरांचे वाटप करण्याची मागणी केली आहे. लाभार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून महापालिकेने त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.

स्थापत्य आणि झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग ठेकेदाराला वर्षानुवर्षे पोसण्याचे काम करत आहेत. ठेकेदाराला दर वाढवून देण्यासाठी घरकुल प्रकल्पातील घरांच्या वाटपात दिरंगाई केली जात आहे. घराचे स्वप्न लांबत चालल्याने लाभार्थ्यांचा संयम संपत चालला आहे. येत्या सात दिवसांत घरे लाभार्थ्यांना देण्याची कार्यवाही पुर्ण न केल्यास विविध मार्गातून आंदोलन छेडणार आहोत.
– अजीज शेख, सामाजिक कार्यकर्ते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)