काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील कैसार जिल्ह्यातील फर्याब भागात तालिबानच्या आतिरेक्यांनी कैद करुन ठेवलेल्या जवळपास 83 नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना यश मिळाले आहे.अफगाण सुरक्षा दलाचे प्रवक्ता मोहम्मद हानिफ राझी यांनी ही माहिती स्थानिक माध्यमांशी बोलताना दिली आहे. मात्र, तालिबानच्या प्रवक्त्यांनी अद्याप याची पुष्टी दिली नाही.
लवकरच या नागरिकांना जवळच्या सेना तळावर नेण्यात येणार असुन त्यांची ओळख पटविण्याचे आणि इतर माहिती घेण्याचे काम केले जाईल. त्यानंतर त्यांना आपापल्या कुटूंबांकडे सोपविण्यात येणार आहे, असेही मोहम्मद हानिफ राझी यांनी सांगितले. तालिबानच्या आतिरेक्यांनी या लोकांना सरकारसाठी हेरगिरी करण्याच्या संशयातून बंदी बनवले होते.