80 टक्‍के जागेशिवाय कामास नकार

चांदणी चौक उड्डाणपूल : एनएचएआयला पालिकेने केली होती विनंती

पुणे : चांदणी चौकाच्या उड्डाणपुलासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे 9 हेक्‍टर जागा ताब्यात घेतली आहे. त्यानुसार, ही जागा हस्तांतरण करण्यासाठी महापालिकेकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) विनंती केली असता एनएचएआयने 80 टक्‍के जागा ताब्यात आल्याशिवाय काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकाही हतबल झाली आहे. दरम्यान, प्रशासकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरीत भूसंपादन ऑक्‍टोबर अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचेही प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने या चौकात दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. मात्र, त्याचे काम “एनएचएआय’कडून केले जाणार आहे. हे भूमिपूजन मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. मात्र, त्यानंतरही या पुलासाठी आवश्‍यक जागा ताब्यात न आल्याने “एनएचएआय’ने काम सुरू केले नाही. पुलासाठी 13.92 हेक्‍टर भूसंपादन करावे लागणार होते. त्यातील सुमारे 9 हेक्‍टर जागा पालिकेच्या ताब्यात आली असून अजूनही सुमारे साडेचार ते पाच हेक्‍टर जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. ही जागा पुढील काही दिवसांत महापालिकेस मिळणार असून त्यासाठी पालिकेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता हे काम सुरू व्हावे यासाठी पालिकेकडून एनएचएआयला वारंवार जागा ताब्यात घेण्याबाबत विनंती केली जात आहे. सुमारे 75 टक्‍के जागा ताब्यात आली असून उर्वरीत जागाही भूसंपादनाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे एनएचएआयने काम सुरू करावे अशी मागणी करूनही त्यांच्याकडून 80 टक्‍के जागेची अट पुढे करत पालिकेने भूसंपादीत केलेली जागा ताब्यात घेण्यास सरळ सरळ नकार देण्यात येत आहे.

जागा मालक सापडेनात
महापालिकेकडून उर्वरीत जागेच्या संपदानासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, ज्या जागांचा ताबा येणे बाकी आहे. त्या जागांच्या मालकांचा ठाव ठिकाणाच लागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वारंवार जागेवर जाऊनही तसेच महसूल विभागाकडील कागदपत्रे तपासणी केल्यानंतरही मालक सापडत नाहीत. तसेच अनेक शासकीय रेकॉर्डवर एकाच जागेचे दोन मालक आहेत. तर काही ठिकाणी जागा 2 ते 3 गुंठे असून त्यावर मालकांच्या नावाची यादी जवळपास पाच ते सहा जणांची आहे. त्यामुळे नेमका मोबदला कोणाला द्यायचा यावरून हे उर्वरीत भूसंपादन रखडले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अशी आहे सद्यस्थिती
– सप्टेंबर- 2017 प्रकल्पाचे भूमिपूजन
– 13.92 हेक्‍टर जागा पूलासाठी गरजेची
– 9 हेक्‍टर ताब्यात आलेली जागा
– भूसंपादनासाठी शासनाकडून 185 कोटी मंजूर
– 80 टक्‍के जागा ताब्यात आल्याशिवाय काम करण्यास एनएचएआयचा नकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)