80 टक्के दिव्यांगत्वांना दरमहा हजार रूपये 

मुंबई: 80 टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्या निराधार व्यक्तींना आता दर महिन्याला एक हजार रूपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दिव्यांग लाभार्थ्यासाठी उत्पन्न मर्यादाही 21 हजारावरून 50 हजार करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 35 हजार 512 दिव्यांग लाभार्थींना याचा लाभ मिळेल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.
मंत्रालयात पत्रकारांसोबत राजकुमार बडोले बोलत होते. संजय गाधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील 40 टक्के ते 79 टक्केपर्यंत दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांना 800 रुपये, तर 80 टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्यांना 1000 रूपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पूर्वी अर्थसहाय्याची रक्कम 600 रूपये देण्यात येत होती. अर्थसहाय्यात वाढ केल्यामुळे 34 कोटी रूपयांचा अधिभार येणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अ गट, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ब गट, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना 80 टक्के व अधिक दिव्यांगत्व अशा सर्व गटातील लाभार्थ्यांची एकूण संख्या 32 लाख 34 हजार 891 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)