128 गुन्ह्यांमध्ये 103 जणांना अटक; 959 लिटर देशीविदेशी मद्य जप्त
नगर: निवडणूक म्हटंल की पैसा आणि दारू वाटप हे होतंच. निवडणूक आयोगाने यावर यंदा चांगलाच पायबंध घालण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे खास पथक स्थापन केले होते. जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघात एप्रिल महिन्यात तब्बल आठ लाखांची बेकायदा दारु जप्त करण्यात आली आहे. या दारूसह वाहने व दारू निर्मितीचे साहित्य असा 43 लाख 73 हजार 674 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक पराग नवलकर यांनी दिली.
गेल्या महिन्यात जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघाची अनुक्रम 23 व 29 एप्रिल रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत होणारी बेकायदा दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर होती. त्यात निवडणूक प्रचार थांबल्यापासून ते मतदान होण्याच्या दिवशापर्यंत असे सलग तीन दिवस जिल्ह्यात ड्राय डे पाळण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल सहा दिवस हा ड्रायडे होता. दि. 21 ते 23 व 27 ते 29 एप्रिल असे सहा दिवस पूर्णपणे दारू विक्रीला बंदी होती. तसेच निवडणूक प्रचारा दरम्यान देखील बेकायदा दारू विक्रीला आळा घालण्यासाठी खास पथके स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने या महिन्याभरात केलेल्या कारवाईत तब्बल आठ लाखांची दारूसह वाहन व साहित्य असा 43 लाख 73 हजार 674 असा मुद्देमाल जप्त केला.
केलेल्या कारवाई दरम्यान 128 गुन्ह्यांमध्ये 18 ठिकाणी बेवारस दारू पकडण्यात आली तर उर्वरित कारवाईमध्ये 110 ठिकाणाहून 103 आरोपींना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश मिळाले. त्याबरोबर हातभट्टीची 807 लिटर, रसायने 8 हजार 275 लिटर, देशी मद्य 693 लिटर, विदेशी मद्य 260 लिटर, बिअर 167 लिटर आणि 1 हजार 507 लिटर ताडी जप्त करण्यात आली. या दारूची किंमत जवळपास आठ लाखांच्या घरात जाते. या सर्व प्रकरणात पोलिसांनी एकूण 24 वाहने ताब्यात घेण्यात आली. त्या वाहनांची किंमत अंदाजे 35 लाख 74 हजार 500 रुपये इतकी होते.
परराज्यातील मद्य, मद्यार्क जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी-विदेशी मद्यासह हातभट्टी न हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनांसह परराज्यातील मद्य 8.9 लिटर तर मद्यार्क 156 लिटर जप्त करण्यात आले आहे. निवडणूक काळात परराज्यातून देखील मद्यार्क जिल्ह्यात येत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.