8 वर्षांच्या संघर्षानंतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा

उच्च न्यायालयाचा निर्णय : 24 वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणार

पुणे – गेल्या 8 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या शालेय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्‍वासित प्रगती योजना अंतर्गत 24 वर्षे सेवेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 24 वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याचे निर्देश दिले आहेत. 24 वर्षे सेवा झालेल्या सर्वच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

-Ads-

राज्य शासनाने 2010 पासून शासकीय कर्मचाऱ्यांना 24 वर्षांनंतर वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्मचारी या सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र, या लाभापासून शालेय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वंचित राहिले होते. यासंदर्भात शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची वेळावेळी भेट घेतली. शिक्षणमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यास तत्वत: मान्यता दिली. मात्र, प्रत्यक्षात लाभ दिला जात नव्हता. प्रत्येकवेळी वित्त विभागाचे कारण सांगून हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. याबाबत संघटनेने आंदोलने, मोर्चा काढली. मात्र, काहीच कार्यवाही होत नव्हती.

सर्व पार्श्‍वभूमीवर अखेर शिक्षकेत्तर संघटनाचे राज्य सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांसह 500 कर्मचाऱ्यांनी न्यायलायात धाव घेतली होती. सर्वप्रकरणी सर्व खटले एकत्र करीत गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना 24 वर्षानंतरची वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. येत्या 8 आठवड्याच्या आत कर्मचाऱ्यांना या सेवेचा लाभ मिळावेत, असेही न्यायालयाने सांगितले. एवढेच नव्हे, तर अन्य कर्मचाऱ्यांना या सेवेचा लाभ मिळण्यासाठी शासन लवकरच आदेश काढेल, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्‍त केली. याबाबत आर्थिक स्थिती, शेतकरी कर्जमाफी अशी कारणे नकोत, याकडे न्यायायलाने लक्ष वेधले.

राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, राज्य कोषाध्यक्ष सुखदेव कंद, जिल्हा अध्यक्ष संजय धुमाळ, जिल्हा कोषाध्यक्ष प्रसन्न कोतूळकर, विनोद गोरे, सुभाष तांबे, प्रविण बागल यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. या निर्णयाचे सर्व शालेय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)