79 कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी व्यापाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे – तब्बल 79 कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणात पोलिसांनी मुंबई येथून अटक केलेल्या व्यापाऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. कॅन्टोन्मेंट येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे जीएसटी कायद्यांतर्गत करण्यात आलेलेली पुण्यातील ही पहिलीच कारवाई आहे. जीएसटीच्या पुणे झोनल युनिटकडून ही कारवाई करण्यात आली होती.

मोदसिंग पद्मसिंह सोढा असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सोढा याने 10 बनावट कंपन्या स्थापन केल्या असून त्याद्वारे 415 कोटी रुपयांचे केवळ कागदी व्यवहार केले आहे. वस्तू न पुरवता देण्यात आलेल्या पावत्यांच्या आधारे हा घोळ करण्यात आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार करून त्याद्वारे काळा पैसा निर्माण करण्यात येत असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. युनिटला मिळाल्या माहितीनुसार चौकशी केली असता, काही व्यक्ती जीएसटी नोंदणी करून त्याआधारे बनावट बिलांद्वारे खोटे इनपुट टॅक्‍स क्रेडिट निर्माण करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात डेटा विश्‍लेषित केल्यानंतर या रॅकेटमधील काही प्रमुख व्यक्तींची नावे मिळाली होती. त्यामुळे पुणे आणि मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी सोढा याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सोढा याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. आशीष पाटणकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. जोपर्यंत संबंधित अधिकारी निर्णय देत नाही, तोपर्यंत त्यांनी पैसे बुडविले असे म्हणता येणार नसल्याचा युक्तीवाद एका दाव्याचा दाखला देत ऍड. पाटणकर यांनी केला. मात्र, न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत सोढा याचा जामीन फेटाळला. दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यात असल्याचे ऍड. पाटणकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)