750 किलो कांदा विकून आले फक्त हजार रूपये

तेच पैसे शेतकऱ्याने मोदींना पाठवून नोंदवला निषेध

मुंबई: नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्‍यातील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांना सुमारे 750 किलो कांदा विकून जेमतेम 1 हजार 64 रूपये इतका अत्यल्प भाव मिळाला. त्यामुळे अत्यंत निराश झालेल्या या शेतकऱ्याने हे 1064 रूपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनिऑर्डरने पाठवून आपला निषेध अभिनव पद्धतीने नोंदवला आहे. ही मनिऑर्डर पाठवण्यासाठी त्यांना 54 रूपयांचा खर्च आपल्या खिशातून करावा लागला आहे. 29 नोव्हेंबर रोजी त्याने ही मनिऑर्डर मोदींना पाठवली आहे.

विशेष उल्लेखनीय बाब अशी की संजय साठे हे असे शेतकरी आहेत की त्यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून प्रगतीशील शेतकरी असा नावलौकिक मिळवला आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्यावेळी त्यांना भेटण्याची संधी साठे यांना देण्यात आली होती. याच साठे यांना आज या स्थितीला तोंड द्यावे लागत आहे.

आपली कैफीयत ऐकवताना साठे म्हणाले की मी निफाडच्या कांदाबाजारात साडे सातशे किलो कांदा आणला त्यावेळी आपल्या कांद्याला केवळ प्रति किलो एक रूपया इतकाच भाव देण्यात आला होता पण आपण घासघिस करून हा भाव 1 रूपया चाळीस पैसे इतका मिळवला. त्याचे आपल्याला केवळ 1064 रूपये पैसे मिळाले. इतक्‍या कमी पैशात उत्पादन खर्च तर सोडाच पण या कांद्याचा वाहतूक खर्चही मिळाला नाही.

आपण त्यासाठी चार महिने शेतात राबून केलेली सारी मेहनत वाया गेली. त्यामुळे आपण हे सारे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या स्थितीचा निषेध म्हणून मनिऑर्डरने पाठवून दिले. आपण स्वता कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक नाही पण या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचेच काम केले आहे असा आक्रोश त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)