750 कर्मचाऱ्यांचा पगार संकटात

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या तिजोरीने गाठला तळ


पुढील महिन्यात पगार कसे करावे? उपस्थित होतोय प्रश्‍न

पुणे – स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) या दोन्ही करांतील वाटा न मिळाल्याने पुण्याच्या स्मार्ट कॅन्टोन्मेंटच्या तिजोरीने तळ गाठला आहे. बोर्डाच्या तिजोरीत सध्या इतकी कमी रक्‍कम शिल्लक आहे, की पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावे? असा प्रश्‍न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. एकूणच करातील वाटा न मिळाल्याने बोर्डाच्या सुमारे 750 कर्मचाऱ्यांवर पगाराचे संकट ओढावले आहे.

कॅन्टोन्मेंटला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) वाटा देण्याची मागणी वारंवार करूनही केंद्र व राज्य सरकारने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डावरील आर्थिक भार वाढला आहे. बोर्डाच्या खात्यात सध्या केवळ 38 कोटी 31 लाख 10 हजार 136 इतकीच रक्‍कम शिल्लक आहे. बोर्डाच्या सध्या चालू असलेल्या प्रकल्पांचा खर्च सुमारे 21 कोटी असून आगामी आर्थिक वर्षातील अत्यावश्‍यक खर्च हा 30.75 कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे बोर्डाची आर्थिक परिस्थिती हलाखीत चालू आहे. अशा परिस्थितीत बोर्डाला लवकरात लवकर निधी उपलब्ध करून न दिल्यास येत्या डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या पगार देणेही बोर्ड प्रशासनाला अवघड होणार आहे.

-Ads-

अत्यावश्‍यक सुविधांवर होणार परिणाम
बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव म्हणाले, “पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाला विविध करांचे मिळून 790 कोटी रुपये मिळणे आहे. मात्र, सातत्याने याबाबत पाठपुरावा करूनही शासनाकडून या मागणीची योग्य दखल घेतली जात नाही. परिणामी बोर्डावर आर्थिक संकट ओढावले आहे. तुर्तास या संकटातून बाहेर पडण्यासाठी बोर्डाला 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डिरेक्‍टर जनरल ऑफ डिफेन्स इस्टेट यांच्याकडे केली आहे. मात्र, हा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास बोर्डाची आर्थिक परिस्थिती आणखी खालावेल. परिणामी बोर्डातर्फे देण्यात येणाऱ्या अत्यावश्‍यक सुविधांवर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.’

बोर्डाचा प्रतिमाह खर्च
पगार – 2.90 कोटी
पेन्शन – 1.50 कोटी
आवश्‍यक खर्च – 1.75 कोटी
एकूण खर्च – 6.15 कोटी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)