“75 टक्‍के हजेरी’ चा नियम अधिकारीच मोडतात

संग्रहित फोटो

सिस्कॉम संघटना: नव्या वर्षाच्या अकरावी प्रवेशाची तयारी सुरु
पुणे – विद्यार्थ्यांना लागू असणारा 75 टक्‍के हजेरीचा नियम हा अधिकारीच प्रक्रिया लांबवून मोडीत काढत असल्याचा आरोप सिस्कॉम या संघटनेने केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी प्रवेशाची तयारी सुरु झाली असून यंदा प्रवेश शासन निर्णयानुसारच व्हायला हवेत असा पवित्रा शिक्षण संघटनांनी घेतला आहे.

मागील वर्षीची झाडाझडती झालीच नाही
अकरावी प्रवेश प्रक्रियेत नेमके किती प्रवेश झाले आहेत, किती विद्यार्थ्यांची हजेरी पूर्ण आहे, कोट्यातील प्रवेश योग्य पध्दतीने दिले आहेत की नाही या सर्व बाबी तपासण्यासाठी शिक्षण विभागाने नोव्हेंबर महिन्यात झाडाझडती होईल अशी घोषणा केली होती. या महिन्यात समितीचे पथक काही शाळांमध्ये अचानक जाऊन पहाणी करेल असे सहाय्यक शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीच पहाणी झाली नाही. संचमान्यता प्रक्रियेतच ही पाहणी उरकून घेतली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान याबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही याला अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून उपलब्ध होऊ शकला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशी कोणती पहाणीच झाली नाही.

मागील वर्षीची अकरावी प्रवेश प्रक्रिया दिवाळीपर्यंत सुरु होती. गेल्या काही वर्षांची परिस्थिती पहाता दरवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर येऊन संपते. त्यामुळेच आता या गोष्टीला लगाम घालणे गरजेचे असल्याचे मत सिस्कॉम संघटनेच्या संचालिका वैशाली बाफना यांनी व्यक्‍त केले आहे. त्यांनी याबाबत माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांना पत्र लिहून प्रवेश प्रक्रियेतील बदल सुचविले आहेत.
दैनिक प्रभात शी बोलताना बाफना म्हणाल्या, शासनाच्या निर्णयातच विद्यार्थ्यांची हजेरी 75 टक्‍के आवश्‍यक असल्याचे म्हणणे आहे. जर प्रवेश प्रक्रिया ऑक्‍टोबरपर्यंत सुरु राहिली तर विद्यार्थी महाविद्यालयात जाणार कधी? विद्यार्थी हा एकच घटक या प्रवेश प्रक्रियेत सहभागी नसून महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आदी सर्व यंत्रणा या प्रवेशाच्या कामाला लागलेली असते. त्यामुळेच केवळ ऊशीरा प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांवरच नाही तर एकूणात सर्वच विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होतो. म्हणूनच ही प्रवेश प्रक्रिया लांबण न लावता ठरविलेल्या वेळापत्रकात व ठाराविक फेऱ्यांमध्येच संपली जावी अशी मागणी आम्ही पत्रात केली आहे. त्या पुढे म्हणाल्या, अजुनही आपण बघतो की ज्या महाविद्यालयांचे सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये 90 टक्‍के कट ऑफ असतात त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये 50 टक्‍के असणारे विद्यार्थीही येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जास्त गोंधळ होणार नाही तसेच त्यांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे महाविद्यालय मिळावे अशी प्रवेश प्रक्रिया राबवावी.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)