“एफआरपी’ची 71 टक्‍के रक्‍कम वसूल

कारखान्यांना साखर आयुक्‍तालयाने जप्तीच्या नोटिसा दिल्याचा परिणाम


महिनाभरात सुमारे 5 हजार 915 कोटी रुपयांची “एफआरपी’ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा


अद्यापही चार हजार 523 कोटी रुपये कारखान्यांनी थकविले आहेत

पुणे – शेतकऱ्यांची रास्त व किफायतशीर भावाची (एफआरपी) रक्‍कम देणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्‍तालयाने जप्तीच्या नोटिसा दिल्यामुळे त्याचा परिणाम चांगला झाला आहे. राज्यातील एफआरपीची सुमारे 71 टक्‍के रक्‍कम वसूल होण्यास मदत झाली आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरात सुमारे 5 हजार 915 कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाली असून, अद्यापही चार हजार 523 कोटी रुपये कारखान्यांनी थकविले आहेत.

एफआरपीची रक्‍कम थकीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिन्यात साखर आयुक्‍तालयावर हल्लाबोल आंदोलन केले होते. त्यानंतर साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी 44 साखर कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजाविल्या होत्या. थकबाकी असणाऱ्या अन्य कारखान्यांनाही नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे एफआरपीची थकबाकी वसूल होऊ शकली.

राज्यामध्ये 192 साखर कारखान्यांनी 31 जानेवारीपर्यंत 657.25 लाख उसाचे गाळप केले होते. त्यानुसार 16 हजार 123 कोटी रुपयांची एफआरपीची रक्‍कम थकीत होती. 15 ते 31 जानेवारी या कालावधीत 3 हजार 298 कोटी रुपयांची एफआरपीच्या रकमेची वसुली झाली. 1 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत 2 हजार 617 कोटी रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. शुगर केन कंट्रोल ऍक्‍टनुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांशी स्वतंत्र करार केला असल्यास त्या कारखान्यांना गाळपानंतर 14 दिवसांत एफआरपीची रक्‍कम देणे सक्‍तीचे आहे. राज्यातील 17 साखर कारखान्यांनी यापद्धतीने करार केले असून, या कारखान्यांची 518 कोटी रुपयांची एफआरपीची रक्‍कम आहे.

साखर आयुक्‍तांनी केलेल्या कारवाईमुळे सुमारे 71 टक्‍के एफआरपी शेतकऱ्यांना मिळू शकली असल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर हा 2900 प्रति क्विंटलवरून 3100 रुपये केला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून आणखी एफआरपी दिली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

शून्य टक्‍के एफआरपी देणाऱ्यांमध्ये 6 कारखाने
राज्यातील गाळप केलेल्या 192 साखर कारखान्यांपैकी 20 कारखान्यांनी शंभर टक्‍के एफआरपीची रक्‍कम दिली आहे. मात्र, 6 कारखान्यांनी 1 रुपयाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. 80 ते 90 टक्‍के एफआरपी दिलेले 44 कारखाने आहेत. 60 ते 69 टक्‍के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या सर्वाधिक 62 आहे. 40 ते 59 टक्‍के एफआरपी देणारे कारखाने 42 असल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)