प्रोफाईल अपडेटचे 7 हजार उमेदवारांचे अर्ज निकाली

पवित्र पोर्टल : एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून नोंदविता येणार पसंतीक्रम

पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी दोन महिन्यांत 7 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारांना लॉगिनची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने सर्व अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये सुमारे 12 हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी संस्थांकडून पोर्टलवर 900 जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उमेदवारांना शाळांचे पसंतीक्रम नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पोर्टलवर 1 लाख 23 हजार उमेदवारांनी पूर्वीच नोंदणी केलेली आहे. यातील काही उमेदवारांची माहितीच अपडेट झाली नव्हती. या उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना अनेकदा लॉगिन खुले करुन माहितीत दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. प्रवर्ग बदल करणे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची नोंदणी करणे, अर्ज स्वप्रमाणित करणे, अर्जाची प्रिंट काढणे अथवा अन्य काही बदल करण्याकरीता उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेली आहेत.

राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत कक्षांचा विचार करता पुण्यातील मदत कक्षातच सर्वात जास्त उमेदवारांची दररोजच गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मदत केंद्रात उमेदवारांकडून लेखी अर्ज व ओळखपत्राची झेरॉक्‍स प्रत दाखल करुन घेऊनच त्यांचे लॉगिन खुले करुन दिले जात आहे. 22 जानेवारीपासून ते आजतागायत उमेदवारांकडून दुरुस्तीसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल झाल्यानंतर तत्काळ ते निकाली काढण्यावर अधिकाऱ्यांनी भर दिला आहे. उमेदवारांच्या विविध प्रश्‍नांची उत्तरेही अधिकाऱ्यांकडून देण्यात येतात.

उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आता 31 मार्चपर्यंत शेवटच्या मुदतीची संधी देण्यात आलेली आहे. यानंतर आता शिक्षण विभागाकडून पुन्हा जास्त कालावधीसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून समजले आहे.

अजूनही तांत्रिक अडचणी
पवित्र पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी उमेदवारांचे लॉनिग खुले करुन देण्यात येत असले तरी सर्व्हर डाऊन होत असल्याने पोर्टल ओपनच होत नसल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात येऊ लागल्या आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांकडून संतापही व्यक्त करण्यात येऊ लागला आहे. दरम्यान तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरु असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. यामुळे उमेदवारांसाठी 2 एप्रिलपर्यंत प्रोफाईल अपडेटसाठी सुविधा उपलब्ध राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)