70 टक्‍के बीआरटी स्टॉप नादुरुस्त आणि असुरक्षित

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : दरवाजे उघडेच; प्रवाशांचा जीव धोक्‍यात

पुणे – जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी शहरात “बीआरटी’ सुरू करण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच बीआरटी स्टॉपच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बस स्टॉपचे दरवाजे नादुरुस्त स्थितीत असून उघडेच राहात आहेत. याबाबत सातत्याने तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची स्थिती आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“बीआरटी’ मार्गातील बसस्टॉपचे लाईट, डिस्प्ले बोर्ड सातत्याने बंद असणे, शिवाय अनेक बसस्टॉपवरील ऑटोमॅटीक दरवाजा उघडाच राहतो. यामुळे लहान मुले यातून डोकावतात. परिणामी, एखादी अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्रव्यवहार करूनही दुरुस्ती केली जात नाही. सुरक्षेचा मुद्दा असूनही प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे.

या मार्गावरील स्टॉपची खराब स्थिती 
– नगर रोड बीआरटी
– आळंदी-विश्रांतवाडी बीआरटी

पीएमपीएमएल प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी नगररोड बीआरटी मार्गाची पाहणी करण्यात आली. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये स्थानकाचा दरवाजा न उघडणे किंवा दरवाजे कायमच उघडे राहाणे अशा त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची सूचना देण्यात आली होती. तसेच, महापालिकेला लेखी कळविले होते. त्यानंतर किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. पण, सध्या ही स्थिती जैसे थे असून नगररोड आणि आळंदी-विश्रांतवाडी बीआरटी मार्गावरील 70 टक्‍के स्टॉप नादुरुस्त असल्याचे खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच, याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप दुरुस्तीसाठी अंमलबजावणी झाली नसल्याने प्रवाशांची सुरक्षा ऐरवणीवर आली आहे.

बस आल्यानंतर दरवाजे उघडणे अपेक्षित असताना काही ठिकाणचे दरवाजे उघडेच राहात आहेत. यासंदर्भात पीएमपी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने यात लक्ष घालून बीआरटी दुरुस्त करून द्यावी, अन्यथा हे मार्ग बंद करावेत.
– संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच


नगररोड “बीआरटी’ मार्गाबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विशेषतः काही थांब्यांचे दरवाजे उघडेच राहात असल्याचे कळवण्यात आले असून महापालिकेने ते दुरुस्त करून देण्याची गरज आहे. याचा पाठपुरावा आमच्याकडून सुरू आहे.
– अजय चारठाणकर, सह. व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)