70 टक्के नवमातांचे पोषण आहाराकडे दुर्लक्ष

बदलत्या जीवनशैलीचा नवमातांच्या आरोग्यावर परिणाम : पाहणीतून बाब समोर

पुणे – बदलती जीवनशैली, विभक्त, छोटी कुटुंबपद्धती यांच्या विपरित परिणामामुळे नवमातांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. शहरातील 70 टक्के महिला या प्रसुतीच्या दोन महिन्यांनंतर पोषक आहार घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. यामुळे नवमातांच्या आरोग्याबरोबरच बाळाच्या वाढीवर देखील परिणाम होतो.

नव्याने प्रसुती झालेल्या मातेमध्ये शारीरिक आणि भावनिक पातळीवर अनेक बदल होत असतात. त्यामुळे ताकद परत मिळविण्यासाठी तिने पुरेशा प्रमाणात आहार घेऊन स्वत:ची काळजी घेणे अत्यावश्‍यक असते. पण, जीवनशैलीतील बदलांमुळे त्यांच्या पोषक आहारातही बदल होत आहेत. याचा बाळाच्या वाढीवर आणि पोषणावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहे. 70 टक्के नवमातांकडून पोषण आहाराबाबत पालनच होत नसल्याचे मदरहूड रुग्णालयातील डॉक्‍टरांनी जागतिक पोषक आहार सप्ताहानिमित्त केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

याबाबत रुग्णालयाच्या कार्यकारी आहारतज्ज्ञ डॉ. अल्का भारती म्हणाल्या, “बहुतेक नवमाता प्रसुतीच्या दोन महिन्यांनंतर पोषक आहार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. याची दोन कारणे आहेत. त्या नोकरदार महिला असतात किंवा त्यांचे छोटे कुटुंब असल्यामुळे त्यांना पोषण आहार घेणे कठीण होऊन बसते. स्तनपान करण्याच्या पूर्ण 6 महिन्यांच्या काळात उत्तम आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अपुरा आणि पुरेसा पोषक आहार न घेतल्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतोच, त्याचबरोबर दीर्घकालीन विचार करता त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणून नवमातांनी पुरेसा सकस आहार घ्यावा आणि त्यात योग्य प्रमाणात कॅलरी, प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार यांचा समावेश असावा.’

नवमातांनी आहाराबाबत घ्यावयाची काळजी
दैनंदिन आहाराची दिनचर्या आखून घ्या आणि तिचे पालन करा.
दिवसातून 5 ते 6 वेळा आहार घ्या. त्यात प्रथिने, हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असावा.
सुका मेवा, एनर्जी बार, सुक्‍या मेव्याचे लाडू, फळे इत्यादी जिन्नस जवळ बाळगा, जेणेकरून तुम्हाला पटकन काही खायची इच्छा झाली तर तोंडात टाकण्यासाठी काहीतरी असेल.
तेलकट आणि मसालेदार पदार्थ, अतिप्रमाणात चहा व कॉफी पिणे टाळा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)