गझनी (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानाच्या दक्षिणेकडील गझनी प्रांतात भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये 7 बालकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अन्य दोघेजण जखमीही झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सर्व मुले 7 ते 9 वर्षांची होती. यातील 4 मुले तर त्यांच्या पालकांचे एकमेव अपत्य होते. बालकांच्या हत्येची कृती मानवाधिकारांचे थेट उल्लंघन करणारी असल्याची टीका गझनी प्रांताचे प्रवक्ते अरेफ नूरी यांनी केली आहे. राजधानी काबूलच्या दक्षिणेकडील गझनी प्रांतात मुख्य रस्त्यावर तालिबान्यांनी सुरक्षा रक्षकांना लक्ष्य करण्यासाठी हा भूसुरुंग पेरून ठेवला होता.
तालिबानकडून या भूसुरुंगाच्या स्फोटाची जबाबदारी लगेच घेतली गेलेली नाही. तालिबान्यांकडून सुरक्षा रक्षकांवरील हल्ल्यासाठी नेहमीच अशाप्रकारे भूसुरुंगांचा स्फोट घडवून आणला जातो. मात्र या भूसुरुंगांमुळे सर्वसामान्य नागरिकांचाही जीव जातो. अफगाणिस्तानमध्ये पेरलेले भूसुरुंग, न फुटलेले हातबॉम्ब, स्फोट न झालेले मोर्टार, रॉकेट अनेक ठिकाणी सापडतात. लहान मुले त्याच्याशी खेळायला लागल्यावर त्याचा स्फोट होतो. गेल्या महिन्यात पूर्वेकडील लाघमान प्रांतात अशाच एका न फुटलेल्या मोर्टारच्या स्फोटात 7 मुले ठार झाली होती. तर 10 जखमी झाली होती.
संयुक्त राष्ट्राच्या नोंदीनुसार अफगाणिस्तानमध्ये 2018 मध्ये 3,804 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 900 बालकांचा समावेश होता.