7 हजार पोलिसांचा खडा पहारा

सीसीटीव्हींचीही नजर : गणेशोत्सवानिमित्त यंत्रणा सज्ज

पुणे – वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचा प्रारंभ गुरुवारपासून होत आहे. राज्य तसेच परराज्यातून उत्सवाच्या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक येतात. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. उत्सवाच्या कालावधीत शहरात 7 हजार पोलिसांचा खडा पहारा राहणार असून, मध्यभागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दलाचे जवानही तैनात असणार आहेत.

गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी पोलिसांनी गेल्या महिनाभरापासून सुरू केली आहे. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांनी बैठकीचे आयोजन केले होते. शहरात नोंदणीकृत 3 हजार 245 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 उपायुक्त, 36 सहायक आयुक्त, 200 पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक मिळून 525 अधिकारी तसेच 7 हजार पोलीस शिपाई बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. गृहरक्षक दलाचे 500 जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी पोलिसांना मदत करणार आहेत.

बेलबाग चौक, मंडई परिसरात महिला भाविकांचे दागिने, पर्स तसेच मोबाइल लांबवण्याचे प्रकार होतात. यामुळे मध्य भागात साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागातील मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळांच्या परिसराची बॉम्बशोधक नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. प्रमुख मंडळांच्या मांडवांच्या परिसरात धातुशोधक यंत्रे (मेटल डिटेक्‍टर) बसविण्यात येणार आहेत.

मंडळांनी सुरक्षाविषयक उपाय करावेत
शहर तसेच उपनगरात 1,247 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष (कमांड सेंटर) पुणे पोलीस आयुक्तालयात आहे. काही ठिकाणी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. मांडवाच्या परिसरात सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. संशयित व्यक्ती तसेच बेवारस वस्तू आढळल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी क्रमांक-100) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)