‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग

पुणे – शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 683 शिक्षकांनी “ई-साहित्य’ तयार करुन “दीक्षा’ ऍप समृध्द करण्यास मदत केली आहे. राज्यात दिवसेंदिवस शाळांची संख्या वाढू लागली आहे. यात प्राथमिक व माध्यमिक शाळांचा समावेश आहे.

सध्या राज्यात 1 लाख 6 हजार 527 प्राथमिक शाळा तर 26 हजार 879 माध्यमिक शाळा आहेत. यातील बहुसंख्य शाळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागलेला आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी अभ्यासक्रमाशी संबंधित “ई-साहित्य’ निर्माण करण्याकडे आता जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येऊ लागले आहे. शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत “मित्रा’ ऍपचे रुपातंर “दीक्षा’ मध्ये करण्यात आलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2 जुलै 2018 रोजी “दीक्षा’ ऍपचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषदेच्या दीक्षा ऍपवर महाराष्ट्र इन सर्व्हीस टिचर्स रिसोर्स ऍपमित्र 20 हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आले आहे. शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरण्यास सूट देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत राज्यातील 683 शिक्षकांनी व 50 अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी “दीक्षा’ ऍप विकसित करण्यासाठी सहभाग नोंदविला आहे. या शिक्षकांनी “ई-साहित्य’ तयार करण्यात महत्वाची भूमिका बजाविली आहे. इयत्ता पहिली ते दहावीच्या पाठ्य पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठासाठी क्‍यूआर कोड दिलेला आहे.

क्‍यूआर कोडच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले सर्व “ई-साहित्य’ दीक्षा ऍपला जोडण्यात आलेले आहे. “ई’ साहित्य डाऊनलोड करुन ते सर्वांनाच पाहता येणार आहे. प्रामुख्याने दुर्गम भागातील शाळेमधील शिक्षक व विद्यार्थी यांना या “दीक्षा’ ऍपचा फार फायदा होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून समजले आहे.

“दीक्षा’ ऍपवर कोठेही व कोणत्याही वेळी अभ्यासक्रमाचे “ई-साहित्य’ सहजासहजी उपलब्ध होऊ लागले आहे. याचा फायदा जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी जनजागृती करण्यावरही भर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)