63 कोटी 49 लाख 65 हजारांचा टंचाई आराखडा तयार

दोन टप्प्यात प्रस्ताव : पहिल्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

10 तालुक्‍यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ

पुणे – जिल्ह्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, 10 तालुक्‍यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जून 2019 पर्यंतचा 63 कोटी 49 लाख 65 हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. हा टंचाई आराखडा दोन टप्प्यातील असून त्यातील डिसेंबर पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील 26 कोटी 80 लाख 90 हजारांच्या आराखड्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यात सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत असून, दुष्काळी तालुक्‍यात खरीप हंगाम काही अंशी हाती लागला असला तरी रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. तसेच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करणे, किरकोळ देखभाल दुरुस्ती, तातडीने विंधनविहीर अधिग्रहन या सारख्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी पाण्याची स्थिती चांगली असल्याने उन्हाळ्यासाठी 35 कोटी 35 लाखांचा टंचाई आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला होता. मात्र, यंदा ऑक्‍टोबरमध्येच दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने जून 2019 पर्यंतचा 63 कोटी 49 लाख 65 हजारांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये वेळप्रसंगी वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी सांगितले.

जूनपर्यंत 223 टॅंकरचे नियोजन
प्रशासनाने जूनपर्यंत 223 टॅंकरचे नियोजन केले असून, डिसेंबर 2018 पर्यंतच्या तिमाहीचा 26 कोटी 80 लाखांच्या आराखड्यास जिल्हाधिकऱ्यांनी मंजुरी दिली आहे. मंजूर आराखड्यामध्ये 1 हजार 98 नवीन विंधन विहीर, 114 नळ योजनांची विशेष दुरुस्ती, 352 विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, 87 टॅंकर, 32 विहिरींचे अधिग्रहण व 36 विहिरींचे खोलीकरण करण्यासाठी 26 कोटी 80 लाख 90 हजारांचा आराखडा तयार केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)