सातारा, माढ्यात सरासरी 60 टक्के मतदान

दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद : 23 मे रोजी फैसला

सातारा – देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा व माढा मतदारसंघात मंगळवारी चुरशीने मतदान झाले. दोन्ही मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले असून खा. उदयनराजे व नरेंद्र पाटील यांच्यासह माढ्यात रणजितसिंह ना.निंबाळकर व संजय शिंदे यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दरम्यान, मतमोजणी 23 मे रोजी होणार असून त्या दिवशीच फैसला होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सातारा मतदारसंघात 54 टक्के तर माढा मतदारसंघात 57 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, मतदानासाठी अद्याप एक तास वेळ बाकी होता आणि मतदारांच्या लांबच रांगा लागल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. त्यामुळे साहजिकच दोन्ही मतदारसंघाचे मतदान 60 टक्‍क्‍यांच्या आसपास होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली.

मतदान यंत्र बिघाडामुळे विलंब

सातारा शहरासह मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे मतदान प्रकियेस विलंब होत होता. मात्र, काही वेळात मतदान यंत्र बदलल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत झाली. विशेष बाब म्हणजे, सातारा व माढा दोन्ही मतदार संघात मतदानामध्ये फेरफार होत असल्याचा कोणताही आरोप राजकीय पक्षांनी केला नाही.

साताऱ्यात खा. उदयनराजेंनी तर ढेबेवाडी ता. पाटण येथे नरेंद्र पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सात ते नऊ यावेळेत केवळ सात टक्के मतदानाची नोंद झाली होती. पुढे मतदानाचा जोर वाढला. सकाळी 11 वाजता मतदानाची टक्केवारी 18 टक्‍क्‍यांवर पोहचली. तर दुपारी एक वाजपर्यंत 32 टक्के आणि तीन वाजेपर्यंत 44 टक्के तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54 टक्के इतके मतदान झाले होते. सातारा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 9 लाख 74 हजार 875 इतके मतदान  झाल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय मतांची संख्या व कंसात टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.

वाई विधानसभा मतदारसंघात 1 लाख 68 हजार 717 ( 51.11 टक्के), कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 61 हजार 185 ( 54.31 टक्के), कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 64 हजार 227 (56.49 टक्के), कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 62 हजार 458 (56.22 टक्के), पाटण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 49 हजार 785 (50.30टक्के) तर सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात 1 लाख 68 हजार 503 (50.36 टक्के) इतके मतदान झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 10 लाख 73 हजार 773 इतके मतदान झाल्याची नोंद झाली आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 70 हजार 926 (56.43 टक्के ), माढा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 95 हजार 151 (60.11 टक्के ), सांगोला विधानसभा मतदारसंघात 1 लाख 59 हजार 702 (55.18 टक्के), माळशिरस विधानसभा मतदारसंघात 1 लाख 83 हजार 351 (57.39 टक्के), फलटण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 81 हजार 176 (56.69 टक्के ) तर माण-खटाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 77 हजार 467 (52.47 टक्के ) मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)