60 लाख पेंशनर्सचा सरकारविरोधात एल्गार

जंतरमंतरवर आंदोलन
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भगतसिंग कोश्‍यारी समितीच्या शिफारशीप्रमाणे तीन हजार रूपये पेंशन देण्याचे आश्वासन न पाळल्यास 2019 मध्ये सरकारला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा धमकीवजा इशारा देशभरातील 60 लाख पेंशनधारकांनी येथे दिला.

महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार आले तर 90 दिवसांच्या आत कोश्‍यारी समितीच्या शिफारशीप्रमाणे पेंशन देण्याचे आश्वासन विद्यमान मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 2013 मध्ये दिले होते. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने पेंशनर्सच्या समस्यांच्या अभ्यासासाठी भगतसिंग कोश्‍यारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने 186 असंघटीत औद्योगिक क्षेत्रातील 60 लाख पेंशनर्सना तीन हजारापेक्षा जास्त पेंशन देण्याची शिफारस केली होती. हा मुद्या भाजपच्या खासदारांनी रेटून लावला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच भाजपने रंग बदलला, असा आरोप पाठक यांनी केला. ते म्हणाले की, सरकारी खजिन्यात पैसे नसल्यामुळे कोश्‍यारी समितीची शिफारस लागू करणे शक्‍य नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी खासदार दिलीप गांधी यांना पत्र लिहून दिली आहे. या पत्रानंतर देशभरातील 62 लाख पेंशनर्सचे पित्त खवळले असून त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्हाला सरकारचा एक पैसा नको आहे. तर पेंशन योजनेंतर्गत आमच्या वेतनातून कपात झालेल्या रकमेतूनच आम्हाला आमचे पैसे हवे आहेत. सरकारच्या तिजोरीतून आम्हाला छदामही नको आहे, असे पाठक म्हणाले.

पेंशन योजनेंतर्गत सरकारच्या तिजोरीत आतापर्यंत लाखो-करोड रूपये जमा झाले आहे. सरकारने हा पैसा पब्लिक फंडमध्ये गुंतविला. यानंतरही सरकारकडे तीन लाख कोटी रूपये या योजनेतील जमा आहे. हा पैसा योग्य ठिकाणी गुंतविला असता तर निव्वळ व्याजातून कोश्‍यारी समितीच्या शिफारशीनुसार पेंशन देता आले असते.

दरम्यान, केंद्र सरकारने कोश्‍यारी समितीनुसार पेंशन लगेच वाढवून नाही दिली तर देशभरातील 62 लाख पेंशनधारक वर्षभर सरकारच्या विरोधात प्रचार करतील. आणि याची किंमत 2019 लोकसभेच्या निवडणुकीत सरकारला मोजावी लागेल, असे पाठक यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)