6 महिन्यांत 6 हजार 149 गर्भपात

– गुंतागुंतीच्या गर्भावस्थेमुळे गर्भपाताची वेळ
– धकाधकीच्या जीवनशैलीमुळे गर्भधारणेत समस्या

प्रशांत घाडगे
पिंपरी – आधुनिक काळात माणसाच्या जीवनशैलीत झपाट्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. समाजात सद्य परिस्थितीत बहुतांशी स्त्रिया नोकरी करत असल्याने त्यांचे जीवन धकाधकीचे बनले आहे. महिलांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेक दाम्पत्य “एवढ्यात मूल नको’ असे म्हणत “फॅमिली प्लॅनिंग’ करतात. तसेच, अचानक महिलांची गर्भधारणा झाल्यास कायद्यानुसार गर्भपात केला जातो. मात्र, या गर्भपातामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात तब्बल 6 हजार 149 गर्भपात झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

अनेक पती-पत्नींचे भविष्यातील “प्लॅनिंग’ करताना इतक्‍यात मूल नको या भूमिकेत राहतात. मात्र, काही वेळा गर्भधारणा झाल्यास “गर्भधारणा’ या कायद्याअंतर्गत मान्यता असलेल्या डॉक्‍टरांकडून गर्भपात करुन घेतला जातो. मुळात गर्भपात ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. स्त्रियांच्या रोजच्या धकाधकीमुळे बहुतांशवेळा नैसर्गिकरित्या गर्भपात झालेले आहेत. सरकारमान्य केंद्रामध्ये गर्भपात करणे सुरक्षित मानले जात असल्याने त्या ठिकाणी अनेकदा गर्भपात केले जातात. तसेच, कित्येक स्त्रिया डॉक्‍टरांचा सल्ला न घेता गर्भपाताच्या गोळ्या खात असल्याने याचा स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गरोदरपणाच्या काळात महिलांच्या शरीरात गर्भाची वाढ होत असताना काही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. यावेळी, नाईलाजास्तव गर्भपात करुन घेण्याची वेळ गरोदर स्त्रियांवर येत असते. परंतु, गर्भपात करताना हलगर्जीपणा झाल्यास त्याचे गंभीर परिणाम स्त्रियांवर होत असल्याने काळजी घेणे अत्यावश्‍यक असते.

महिलांनी गर्भपात करताना तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला न घेणे व अपुऱ्या साधन सामुग्रीचा वापर केल्यास महिलांच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता असते. गर्भपात झाल्यानंतर काही समस्या आढळल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला आवश्‍यक आहे. याचबरोबर, अतिरक्तस्त्राव, पोटात वेदना न थांबणे, सतत ताप येणे या सारखी लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार घेणे गरजेचे आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मंगल तुपे यांनी संगितले.

महिलांच्या आरोग्यावर परिणाम
कुटुंबात मूल जन्माला येणे हा कुटुंबासाठी व प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये आनंददायी भाग असतो. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव काही स्त्रियांवर गर्भपात करुन घेण्याची वेळ येते. यामुळे, स्त्रियांच्या मानसिक व शारिरिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्‍यता निर्माण होते. नको असलेला गरोदरपणा टाळण्यासाठी स्त्री व पुरुष या दोघांसाठी शासकीय रुग्णालयामध्येही गर्भनिरोधक आवश्‍यक साधने उपलब्ध आहेत. गर्भपात करण्याऐवजी त्याचा वापर करण्याचे आवाहन स्त्री रोग तज्ज्ञ करत आहेत.

लग्न झाल्यानंतर पती-पत्नींनी “फॅमिली प्लॅनिंग’ करणे आवश्‍यक आहे. याचबरोबर, लहान वयातच गर्भपात केल्यास धोके अधिक वाढत जातात. स्त्रियांना इतर आजार जडलेले असताना गर्भपात केल्यास वंध्यत्व येण्याची शक्‍यता असते. यामुळे, वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात करणे आवश्‍यक आहे.
– डॉ. सुनिता काळे, स्त्री-रोग तज्ज्ञ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)