‘शोले’ – 1975

रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले’ हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला. जवळ जवळ 42 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट; पण आजही याची लोकप्रियता कमी झाली नाही. एखादी मैफल जमून यावी तसा शोले हा एकदम जमून आलेला चित्रपट. संवाद, कथा गाणी आणि अभिनयाने सजलेला शोले हा चित्रपट पाहिला नाही, असा सिनेशौकीन शोधूनही सापडणे मुश्‍किल. चित्रपटातली गाणी लोकांना पाठ असतात. पण शोलेचे डायलॉग लोकांना तोंडपाठ झाले होते, आजही आहेत.
पोलीस आणि गुंड अशी नेहमीची कथा असलेला चित्रपट; पण जेवढा हीरो चित्रपटामध्ये भाव खाऊन जातो त्यापेक्षाही व्हिलन लोकांना जास्त आवडला. सर्वाधिक लोकप्रिय खलनायक अमजदखान. शोले प्रदर्शित होण्यापूर्वी वर्षभर आधी पत्त्यावरून भविष्य सांगणाऱ्या डोलारेस परेरा या बाईंनी अमजदखान यांचं भविष्य वर्तवले होते.
15 ऑगस्ट 1975 या दिवशी शोले मुंबईत एक्‍सेलसिअर आणि मिनर्व्हा अशा दोन थिएटरमध्ये एकाचवेळी प्रदर्शित झाला. एक तर मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत प्रिमिअर शो केल्यावर विविध लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राज कपूरसह सर्वांचा एकच सूर होता. इतका हिंसाचार तोही वेस्टर्न स्टाईल, भारतीयांना मानवणार नाही आणि तीन आठवडे शोलेचे बुकिंग ओस पडले होते. एके दिवशी अमजदखान असरानीजवळ म्हणाले, “”मी प्रयत्नंची शर्थ केली; पण इथून पुढे मला भविष्य नाही मी संपलो,” पण एक महिन्यानंतर बुकिंगसाठी थिएटरपुढे रांगा लागू लागल्या. त्याकाळी 25 रुपयांचे बाल्कनीचे तिकीट 500 रुपये काळ्या बाजारात विकले जाऊ लागले.
खरे तर “शोले’चा केंद्रबिंदू असलेल्या संजीवकुमार यांना स्क्रिप्ट वाचल्यावर गब्बरसिंग साकारण्याचा मोह झाला होता; पण रमेश सिप्पी यांना डॅनी गब्बर म्हणून हवा होता. डॅनी यांनी धर्मात्मा चित्रपटासाठी फिरोझखान यांना तारखा दिल्याने नाईलाज झाला. नंतर सत्येन कप्पू या नाटकात काम करणाऱ्या कलाकाराने माझ्यापेक्षाही अमजद खान नट म्हणून सरस आहे अशी शिफारस केल्याने अखेर अमजदखान यांची गब्बरसिंग म्हणून निवड केली. सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेल्या या कलाकाराला तंबाखूची सवय आत्मसात करावी लागली. गब्बरचे डायलॉग त्याच्याकडे कामाला येणाऱ्या भय्या धोबीकडून त्याने उचलले अन्‌ चंबळच्या खोऱ्यातील भाषेचा लहेजा त्याने पकडला. शोलेतील काही हाणामारीच्या दृश्‍यांचे दिग्दर्शनही अमजदखान यांनी केले.
शोले चित्रपटाच्या गाण्यांसह काही खास प्रसंगातील संवादाच्या रेकॉर्डस आणि कॅसेट्‌स निघाल्या होत्या, त्याची विक्रमी विक्री झाली. रस्त्यावर कुठेही शोलेचे डायलॉग ऐकू येऊ लागले की लोक थांबून डायलॉग ऐकत राहायचे.
शोले थिएटरमध्ये चालू असताना
कितना इनाम रखा है… असा गब्बरसिंगचा डायलॉग चालू असताना,
पुरे पचास हजार… हे प्रेक्षक बोलायचे.
“शोले’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातले छोटं मोठं प्रत्येक पात्र लक्षात राहते. अंधेचाचा (ए. के. हनगल) अंग्रेजोंके जमाने के जलेर (असरानी) मौसी (लिला मिश्रा) सुरमा भोपाली (जगदीप) सांबा (मॅक मोहन) “अंग्रेज लोग जब मरते है तो उसे सुसाड (सुसाईड) कहते है म्हणणारा गावकरी (मामाजी).
वीरू, जय, बसंती, गब्बर, ठाकूर यांचा प्रश्‍नच नाही ते तर आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरले गेले आहेत. या चित्रपटातील सांबाचा रोल करणारे मॅकमोहन यांनी गब्बरच्या प्रश्‍नाला दिलेले उत्तर-
“दो सरकार’ – या शब्दाचे 40 रिटेक झाले होते.
तसंच जया बच्चन यांचा लाईट बंद करण्याचा जो शॉट होता तो जवळजवळ 20 दिवस चालला.
ये दोस्ती हम नहीं… हे गाणे बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यावर चित्रीत झाले होते याच शूटिंग पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागले होते.
सुरुवातीला फक्त चार ओळींचं हे स्क्रिप्ट होते; पण चित्रपट पूर्ण व्हायला अडीच वर्षे लागली. रामगड हे जे खेडे वसवले होते ते बंगलोरपासून पन्नास किलोमीटर असलेले रामनगर नावाचे गाव होते; पण शोलेच्या शूटिंगपासून लोक रामनगरला रामगड म्हणूनच ओळखू लागले.
या चित्रपटामध्ये एकूण सहा गाणी होती. आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि संगीतसाज चढवला होता राहुलदेव बर्मन यांनी. किशोरकुमार, मन्ना डे, लता मंगेशकर, राहुलदेव बर्मन यांनी गायली होती.
शोलेच्या गाण्यांपेक्षा शोलेचं पार्श्‍वसंगीत अतिशय जबरदस्त निर्माता जी. पी. सिप्पी यांनी 1971 सालातील त्यांच्या “अंदाज’ या चित्रपटानंतर मल्टीस्टार चित्रपटाची घोषणा केली होती. त्यावेळी स्क्रीनमध्ये छापून आलेल्या माहितीप्रमाणे या चित्रपटाला शंकर जयकिशन हे संगीतकार म्हणून घोषित करण्यात आले होते; पण त्यावर्षीच जयकिशन यांचे निधन झाले आणि तिथे आर. डी. बर्मन यांची वर्णी लागली.  दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी गब्बरच्या भूमिकेसाठी बऱ्याच नटांचा विचार केला होता; पण अखेर जयंत व्हिलनचा मुलगा अमजदखान याची वर्णी लागली. त्याने गब्बर असा काही उभा केला खलनायकाची प्रथमच क्रेझ निर्माण झाली. विकृत, निर्दयी “गब्बरसिंग’ हाच शोलेचा हीरो ठरला.

– मानसी कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)