शिरूर, मावळमध्ये 59 टक्‍के मतदान

उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद : शांततेत मतदान

पुणे – पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी शांततेत मतदान झाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात 59.55 टक्के तर मावळात 53.12 टक्‍के मतदान झाले. शिरूरमध्ये शिवसेना-भाजपकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये लढत आहे. तर मावळमधून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पार्थ पवार आणि शिवसेना-भाजपकडून श्रीरंग बारणे हे निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. दरम्यान, सर्व लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि.23 मे रोजी होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग आदी उपस्थित होते. शिरूर लोकसभा मतदारसंघात 21 लाख 73 हजार मतदार तर 2 हजार 296 मतदान केंद्र होती. तर मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 97 हजार मतदार तर 2 हजार 504 मतदान केंद्र होती. शिरूर लोकसभा मतदारसंघातून 23 उमेदवार तर मावळ मतदारसंघातून 21 उमेदवार रिंगणात आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तर मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शिरूर व मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. ग्रामीण व शहरी भागात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी असल्याचे पहायला मिळाले. मतदारांमध्ये उत्साह असल्याचे दिसून आले. सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात 6.32 टक्के तर मावळ लोकसभा मतदारसंघात 5.69 टक्के मतदान झाले. सकाळी नऊ ते 11 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी वाढत होती. यावेळेत शिरूरमध्ये 16.21 टक्के तर मावळमध्ये 18.04 टक्के मतदान झाले होते. उन्हाची तमा न बाळगता मतदार दुपारीही घराबाहेर पडताना दिसत होते. दुपारी एक वाजेपर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघात 23.92 टक्के तर मावळमधून 31.11 टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रांवर महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती.

शिरुर मतदारसंघात आंबेगावमध्ये सर्वाधिक
सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघात 58.4 टक्के मतदान नोंदविले गेले. यामध्ये सर्वाधिक मतदान आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 67 टक्के त्या खालोखाल जुन्नरमध्ये 61 टक्के मतदान झाले. तर शिरूरमध्ये 60 टक्के, खेडमध्ये 59 टक्के, भोसरीमध्ये 54 टक्के आणि हडपसरमध्ये 54 टक्के मतदान झाले.

उरणमध्ये 61.8 टक्के मतदान
मावळ लोकसभा मतदारसंघात 58.21 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान उरणमध्ये 61.8 टक्के तर मावळमध्ये 62.28 टक्के मतदान झाले. पनवेलमध्ये 55.3 टक्के, कर्जतमध्ये 60.4 टक्के, चिंचवडमध्ये 57.3 टक्के आणि पिंपरीमध्ये 56.3 टक्के मतदान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)