“59 मिनिटात एक कोटी’ फसवेगिरी?

पिंपरी – अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 59 मिनिटात एक कोटीपर्यंतचे कर्ज ही सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी योजना आणली आहे. या योजनेबाबत उद्योजकांमध्ये प्रचंड उत्साह होता. परंतु 59 मिनिटांमध्ये कर्ज मंजूरी होत असून “इन प्रिंसिपल ऍप्रूव्हल’ होत आहे. नियमित कर्जासाठी जी प्रक्रिया करावी लागते, तीच प्रक्रिया आणि तेवढाच वेळ या योजनेतंर्गतही लागत असल्याने ही योजना एक प्रकारची फसवेगिरी असून एका खासगी कंपनीचे भले करण्यासाठी ही योजना राबवली असल्याचा गंभीर आरोप पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस ऍण्ड ऍग्रीकल्चर या औद्योगिक संघटनेकडून करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चेंबरतर्फे सरकारने नियुक्‍त केलेल्या सरकारी बॅंकेतून कर्ज अर्ज आणून अभ्यास केला. या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकेकडे थेट कर्ज अर्ज दाखल करण्याऐवजी एका वेबसाईटचा संदर्भ दिला आहे. पीएसबीलोनइन59मिनिट्‌स.कॉम या वेबसाईटवर अर्ज दाखल करावयाचा आहे. ही वेबसाईट सरकारी बॅंकेची नसून अहमदाबाद येथील खासगी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नामे कॅपिटल वर्ल्ड प्लॅटफॉर्म प्रा.लि.ची आहे. ही कंपनी नवरंगपुरा, अहमबदाबाद, गुजरात येथील असून कायदे सल्लगार, मॅनेजमेंट सल्लगार, अकाउंट्‌सची कामे करणारे तीनजण या कंपनीचे डायरेक्‍टर्स आहेत.

कर्ज मागणी अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदारास 59 मिनिटांपूर्वी ऑनलाईन पत्र येते की, कर्ज अर्ज मिळाला असून कर्ज मागणी तत्वतः मान्य करण्यात आली आहे अर्थात इन प्रिसिंपल ऍप्रूव्हड. या पत्रासोबत कंपनी बॅंकेचे नाव सांगते आणि 1180 रुपये शुल्क जमा करण्यात सांगण्यात येते. हे शुल्क “कॅपिटल वर्ल्ड’ नावाच्या खासगी कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यानंतरच कर्ज मंजुरीचा विचार करण्यात येतो. तथापी अर्ज मागणी अर्जातील सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात. अर्थातच नियमितपणे उद्योगांसाठी कर्ज घेण्यास जेवढा वेळ, डाक्‍युमेंटेशन आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागते, ते सर्व काही या योजनेत देखील करावेच लागते.

नामंजूरचे 1180 तर मंजूरचे 36180
चेंबरने आरोप केला आहे की, सरकारच्या 59 मिनिटांमध्ये एक कोटी या योजनेतंर्गत एक कोटी अर्ज आले असून हे कर्ज मागणी अर्ज स्विकारण्याचे कंत्राट सरकारी बॅंकेऐवजी एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. आजपर्यंत आलेल्या एक कोटी कर्ज अर्जांपैकी सरकारी बॅंका त्यांच्या कसोटीत बसणाऱ्या व अटी पूर्ण करणाऱ्या दहा टक्‍के अर्जदारांना कर्ज मिळेल असे बॅंकेतील अधिकारी सांगत आहेत. 90 टक्‍के अर्जदारांचे प्रत्येकी 1180 रुपये शुल्कापोटी या खासगी कंपनीला काहीही न करता मिळणार आहेत. मंजूर झालेल्या दहा टक्‍के कर्ज अर्जावर 0.35 टक्‍के कमिशन म्हणजे एक कोटी मागे 35000 रुपये प्रमाणे प्रत्येक अर्जामागे एकूण 36180 रुपये या खासगी कंपनीला मिळणार आहेत. “कॅपिटल’ या खासगी कंपनीची जबाबदारी फक्‍त पैसे घेणे इतकीच आहे. देशात “एमएसएमई’ची संख्या पाच कोटींपर्यंत आहे. यामुळे या खासगी कंपनीला काहीही न करता कोट्यावधी रुपये मिळणार आहेत.

सर्व उद्योजकांची माहिती एका खासगी कंपनीकडे
प्रतिस्पर्धेच्या या युगात प्रत्येक उद्योजक हा आपल्या आर्थिक उलाढाली, आर्थिक क्षमता आपल्या प्रतिस्पर्ध्यास कळू नये, याची काळजी घेत असतो. परंतु सरकारच्या या योजनेमुळे देशभरातील सर्व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांची सर्व वैयक्‍तिक, आर्थिक, व्यावसायिक अशी सर्व इत्यंभूत माहिती एका खासगी कंपनीकडे जमा होत आहे. ही सर्व माहिती “कॅपिटल’ सुरक्षित राहिल याची खात्री व हमी नाही. एक खासगी कंपनी सरकारला सरकारी बॅंकापेक्षा अधिक सुरक्षित कशी काय वाटू शकते? असा प्रश्‍न चेंबरच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. 2015-16 मध्ये शून्य नफा असणाऱ्या या खासगी कंपनीकडे कोणतेही विशेष कार्य, उत्पादन न करता शेकडो कोटी रुपये जमा होत आहेत. पुढे ही कंपनी शेकडो हजारो कोटींचे कर्ज देखील उचलू शकेल, अवघ्या काही महिन्यातच उद्योजकांच्या जिवावर एका कंपनीस हजारो कोटींचे संपत्तीधारक करण्याचा हा डाव आहे की काय? अशी भीती देखील चेंबरने व्यक्‍त केली आहे.

उद्योजक त्रस्त
या योजनेतंर्गत कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या उद्योजकांना सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही योजना मूळ एमएसएमई कर्ज अर्जाची नक्‍कल असून कर्ज घेण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्णच कराव्या लागत आहेत. यामुळे 59 मिनिटात कर्ज मिळण्याच्या अपेक्षेने प्रयत्न करत असलेल्या उद्योजकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)