साताऱ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित

नागरिक हैराण तर कार्यालयातील कामकाज ठप्प

सातारा  – चार दिवसांपूर्वी वळवाच्या पावसाला सुरुवात झाल्यापासून सातारा शहर व परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे सातारकर नागरिक हैराण तर झालेच आहेतच त्याचबरोबर शासकीय कार्यालयांसह, बॅंका, खासगी अस्थापनांमधील कामे ठप्प होत आहेत. एकणूच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महावितरणने आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

दरवर्षी वळवाचा पाऊस जास्तीत जास्त मे महिन्यापर्यंत लांबताना दिसून आला. मात्र, यंदा वळीव कोसळायला जून महिन्याचा दुसरा आठवडा उजाडावा लागला. मागील रविवारी भल्या पहाटे वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वळवाचा पहिला पाऊस झाला. तेव्हापासून ते शुक्रवारपर्यंत शहर आणि परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत होऊ लागले आहे. शासकीय कार्यालयांसह, बॅंका, खासगी अस्थापनांमधील आणि विशेषत: शहराच्या पाणीपुरवठ्यावर देखील वीज खंडित होण्याचे परिणाम होत आहे. वास्तविक वळीव आणि मान्सून दाखल होण्यापूर्वी ऐन उन्हाळ्यात महावितरणने पूर्वतयारी म्हणून पोल दुरुस्तीची कामे हाती घेतली होती.

त्याचबरोबर धोकादायक झाडांच्या फांद्या दूर करण्याचे काम केले. त्यासाठी ऐन उन्हाळ्यात दर मंगळवारी संपूर्ण दिवस वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर देखील वळवाच्या पावसातच वीजपुरवठा वारंवार खंडित होणार असेल तर येत्या काळात तीन महिने मान्सूनच्या पावसात नियमित वीजपुरवठा होण्याबाबत आतापासून शंका व्यक्त होऊ लागली आहे. मान्सूनमध्ये अशाच प्रकारे वारवांर वीजपुरवठा खंडित झाला तर त्याचा परिणाम शेतीवर देखील तितकाच होणार आहे. कृषीपंपाना वीजपुरवठा होऊ शकला नाही तर विहीर आणि कॅनोलमध्ये पाणी असून ही ते शेतीला देण्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. अशा परिस्थितीत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. अन्यथा येत्या काळात महावितरणला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची दाट शक्‍यता निर्माण होणार आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित होत असताना विरोधी राजकीय पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, अशी विचारणा मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांना करण्यात आली. त्यावर पवार म्हणाले, महावितरणने आठवड्यातून मंगळवारी ह्या दिवशी दुरुस्तीसाठी पुरवठा खंडित करणे समजून घेता येईल. मात्र, सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने आम्ही दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी वादळी वारे व झाडांची कारणे सांगितली. त्याचबरोबर येत्या दिवसांमध्ये वीजपुरवठा खंडित होणार नाही असे आश्‍वासितही केले होते. मात्र, तरी देखील वारवांर वीजपुरवठा खंडित होणार असेल तर येत्या दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल.

– राहुल पवार, (शहराध्यक्ष- महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

दरम्यान, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणे जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता सुनील माने यांच्याशी संपर्क साधला. त्यावर माने म्हणाले, वळवाचा पहिला पाऊस खूपच मोठा झाल्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल पडण्याचे प्रमाण वाढले. तसेच मोठी झाडे देखील पडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, आता दुरुस्तीची कामे जवळपास पूर्ण झाली असून येत्या पावसाळ्यात सातारकरांना नियमित वीजपुरवठा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच कोयनेतील अल्प पाणीसाठ्यामुळे विद्युत निर्मितीवर कोणताही परिणाम झाला नसून तेथे नियमित विद्युत निर्मिती होत आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात सातारकरांवर वीजेचे कोणतेही संकट येणार नाही.

– सुनील माने (कार्यकारी अभियंता-महवितरण) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)