मुंबई – ‘लाव रे व्हिडिओ’ आणि ‘गाजर विवाह’ नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून परीक्षा पेपर आयोजित करण्यात आला आहे. मनसे कडून ‘लाव रे व्हिडिओ’ ला भारतीय जनता पक्षाकडून आज ‘आता बघाच तो व्हिडिओ’ या द्वारे उत्तर देण्यात आले होते. त्यानंतर नवी मुंबई मनसे कडून भाजपला प्रत्युत्तर देत ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका सादर करण्यात आली आहे.
नवी मुंबई मनसेकडून ही प्रश्नपत्रिका सोशल माध्यमांवर शेअर करण्यात आली आहे. ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका शेअर करत यांची उत्तरे शोधण्याचे आवाहन मनसे कडून करण्यात आले आहे. शिवाय त्यासाठी दोन दिवसांचा अवधी देखील देण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गाजर विवाह आयोजित करण्यात आला आहे. चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई यांचा गाजर विवाह आयोजित केला आहे. मनसे कडून ही विवाह पत्रिका सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे. २९ एप्रिल रोजी मुंबई मध्ये मतदान होणार असून याच दिवशी मनसेने विवाहाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे ही पत्रिका चांगलीच चर्चेचा विषय झाली आहे.