गाय आणि निवडणुकांच्या संबंधांची 50 वर्षे

गाय व गोरक्षण हा मुद्दा भारताच्या संदर्भात राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिकच नव्हे तर राजकीय संदर्भात पण वेळोवेळी व विशेषतः निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सार्वत्रिक चर्चेचा विषय बनतो. देशांतर्गत राजकारण, राजकीय पक्ष व निवडणुकीच्या संदर्भात गाईचा संबंध असणारा सर्वांत जुना व तत्कालीन राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेसचा उल्लेख करावा लागतो ही बाब आज अनेकांना आश्‍चर्यजनक वाटणार असली तरी ती एक वस्तुस्थिती आहे.

राजकीय इतिहासाचा मागोवा घेऊन सांगायचे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये 1969 मध्ये पहिली फूट पडून इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस (इंदिरा) म्हणून जो पक्ष निर्माण झाला. त्या पक्षाचे तर निवडणूक चिन्हच मुळी होते गाय-वासरू. याच निवडणूक चिन्हावर इंदिराजींच्या कॉंग्रेसने 1977 पर्यंतच्या विविध निवडणुकी यशस्वीपण लढविल्या होत्या.

त्यापूर्वीचा पण संदर्भ द्यायचा झाल्यास 1952 ते 1969 या प्रदीर्घ काळात राष्ट्रीय कॉंग्रेसचे निवडणूक बोधचिन्ह गोवंशाशी संबंधित असे बैलजोडीच होते. उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रदीर्घकाळात कॉंग्रेसच्या निवडणूक चिन्हांचा हिंदूंच्या धार्मिक भावनांशी कधीही संबंध जोडण्यात आला नाही.

दरम्यान, साठच्या दशकात देशात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात आले. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून 7 नोव्हेंबर 1966 रोजी गोहत्येला विरोध करण्याच्या राष्ट्रीय आंदोलनाचा भाग म्हणून लाखांवर आंदोलक संसदेबाहेर निदर्शन करण्यासाठी जमले होते.

सरकारला हे आंदोलन आणि आंदोलकांची पुरतेपणी कल्पना आली नाही. संपूर्ण देशात पूर्ण गोहत्याबंदीची आग्रही मागणी सरकारने मान्य करावी या उद्देशाने संसदेवर मोर्चाने आलेल्या साधू-आंदोलकांनी आपल्या आंदोलनाला तीव्र स्वरूप देण्यासाठी संसदेवर कूच केले. याचीच परिणती साधूंच्या मोर्चावरील गोळीबारात, त्याद्वारे अनेक साधूंचे गोहत्या बंदीसाठी प्राण जाण्यात तर परिणामी भारतीय राजकारणालाच वेगळी वैचारिक दिशा मिळण्यात झाली.

तसे पाहता गाय आणि कॉंग्रेसचे राजकीय सख्ख्य तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. त्यामुळेच केवळ लोकमान्य टिळकच नव्हे तर महात्मा गांधींनी गोसंरक्षणाला नेहमीच आग्रही प्राधान्य दिलेले दिसू येते. म. गांधी तर गाईच्या सांस्कृतिक महत्तेला पण नेहमीच महत्त्व देत असत. महात्माजी हिंदूंना गाईच्या संदर्भात अधिकाधिक आग्रही राहूनच सल्ला देत असले तरी त्यांच्यात कुणालाही मुस्लीम विरोध दिसून आला नाही व कॉंग्रेसची ही वैचारिक परंपरा राष्ट्रीय आंदोलन काळात कायमच राहिली.

मात्र, 1966 च्या गोहत्याबंदी आंदोलनानंतर गाय या विषयाचा सर्वाधिक प्रभावी वापर करून घेतला असेल तो म्हणजे इंदिराजींनी. जनमानसाची नेमकी जाण असणाऱ्या इंदिरा गांधींनी 5 जानेवारी 1967 च्या लोकसभेतील भाषणात गोहत्येच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्‍त करून एकीकडे गोहत्याबंदी प्रकरणी अभ्यासगटाची नियुक्‍ती केली व त्याचवेळी राज्यांना गोहत्याबंदीची अंमलबजावणी करण्याचे घटनादत्त अधिकार प्रदान केले. राजकीय संदर्भात गोहत्याबंदीला आपले समर्थन भासावे या उद्देशाने 1969 च्या कॉंग्रेस फुटीनंतर इंदिराजींनी तर आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्हच मुळी मोठ्या विचारपूर्वक गाय-वासरू ठेवले व त्याचा त्यांना अपेक्षित राजकीय लाभ पण झाला, हा इतिहास तसा ताजा आहे. नव्या संदर्भात राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचाराला विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान गाय, गोशाळा या विषयाला प्राधान्य दिल्याने गाय व गोसंरक्षण या विषयाची राजकीय नाळ कॉंग्रेसच्या संदर्भात राहुल, इंदिराजी व महात्माजींपर्यंत पोहोचल्याचे नव्या संदर्भासह दिसून आले आहे.

– द. वा. आंबुलकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)