पानसरे हत्येतील संशयितांची माहिती देणाऱ्यास 50 लाखांचे बक्षिस 

एसआयटीतील अधिकाऱ्यांच्या संख्येतही वाढ 
संशयीत आरोपी सातारा आणि पुण्यातील

कोल्हापूर – ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर गोळी झाडणारे मारेकरी विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कराड, सातारा) आणि सारंग दिलीप अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) या फरार संशयितांची माहिती देणाऱ्यास 50 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात प्रगतीचा अभाव असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर गृह मंत्रालयाने मंगळवारी बक्षिसांची ही रक्कम वाढविली आहे.

याशिवाय सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोन फरार संशयित आरोपींना अटक करण्यासाठी सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. या पथकामध्ये यापूर्वी सात अधिकारी होते. मात्र आता 14 अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. या दोघांची माहिती आणि फोटो असलेली भित्तिपत्रके देशात व राज्यांतील शासकीय कार्यालये, शहरांतील महत्त्वाच्या ठिकाणी चिकटवलेली आहेत. या दोघांसंबंधी माहिती देणाऱ्याला गृह विभागाकडून दहा लाखांऐवजी आता 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे पोलीस रेकॉर्डवर आले. या दोघांच्या विरोधातील दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले आहे. या दोघांनाही या खटल्यात जामीन मिळाला आहे. तपास यंत्रणेने पानसरे हत्येमध्ये तिसरे संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोलकर या दोघांचा समावेश असल्याचे दोषारोपपत्रानुसार न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे.

न्यायालयाने या दोघांची माहिती आणि फोटो असलेली भित्तिपत्रके देशात व राज्यांतील शासकीय कार्यालये, शहरांतील महत्त्वाच्या ठिकाणी चिकटवून, वर्तमानपत्रांतही (वॉंटेड) त्यांची माहिती प्रसिद्ध करावी. हे सर्व अधिकार तपास यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत भित्तिपत्रकांद्वारे वॉंटेड आरोपी’ म्हणून त्यांची फोटोंसह माहिती लावण्यात आली आहे. या दोघांची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून गृह विभागाकडून त्याला दहा लाख रुपयांचे बक्षीसही देण्याचे जाहीर केले आहे. पत्रकावर अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, विशेष तपास पथक यांचे फोन नंबर व ई-मेल प्रसिद्ध केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)