पिंपरी-चिंचवडसाठी 50 “ई-बस’

“पीएमपी’च्या ताफ्यात दाखल
काळेवाडी-देहू-आळंदी मार्ग सुरू करण्याचे नियोजन

पिंपरी – पीएमपीएमएलच्या ताफ्यात एकूण 120 ई-बस दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 50 बस पिंपरी-चिंचवड शहरासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व बस बीआरटी मार्गाकरिता वापरल्या जाणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता या मार्गावर या बस धावण्याची शक्‍यता आहे. त्याकरिता निगडी येथील भक्‍ती-शक्‍ती बस टर्मिनलमध्ये या बसचे चार्जिंग केले जात असून, या मार्गावर चाचणी घेतली जाणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार 120 ई-बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याकरिता पुणे महापालिकेचा 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 40 टक्के हिश्‍श्‍यानुसार या बसची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पुण्याच्या वाट्याला 70 तर पिंपरीच्या वाट्याला 50 बस आल्या आहेत. या सर्व बस वातानुकुलीत असून, नेहमीच्या मार्गांवर धावणाऱ्या बस तिकिटाच्या दरातच या बसमधून प्रवास करता येणार आहे. यापूर्वीच निगडी-भोसरी मार्गावर या बस धावत असून, त्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीन तासांच्या चार्जिंगनंतर ही बस 150 ते 200 किलोमीटर अंतर पार करु शकते.

या बस 12 मीटर लांबीच्या असून, भक्‍ती-शक्‍ती बस टर्मिनलमध्ये चार्जिंगकरिता पाच पॉईंट उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवसभरात एकूण 40 बस चार्जिंग करता येणार आहेत. हे चार्जिंग पॉईंट कमी पडत असल्याने, याचठिकाणी आणखी नवीन चार्जिंग पॉईंट निर्माण केले जाणार आहेत. त्याकरिता महावितरणकडून इस्टिमेट मागविण्यात आले आहे.

ऑगस्ट अखेरीस आणखी 200 बस दाखल होणार
पीएमपीएमएलकरिता 500 बस उपलब्ध करुन देण्याची ऑर्डर टाटा मोटर्स कंपनी पूर्ण करु शकली नाही. त्याबाबत महापालिका प्रशासनाने टाटा मोटर्स कंपनी प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे. येत्या गुरुवारी (दि.11) पीएमपीएमएल संचालक मंडळाची बैठक पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात आयोजित केली आहे. या बैठकीला टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनादेखील बोलविण्यात आले आहे. त्यामुळे येत्या ऑगस्ट महिन्याअखेरीस पीएमपीएमएलच्या ताफ्यात आणखी 200 बस दाखल होणार असल्याची माहिती सूत्रामची दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)