50 रुपये भाव द्या, अन्यथा माल रस्त्यावर फेकू

फुल उत्पादक शेतकरी आक्रमक : फुलबाजारात तणाव

पुणे – नवरात्रोत्सवात विशेषत: सजावटीसाठी शेवंतीला मोठी मागणी असते. देवीला वाहणे, वेणी तयार करण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने व्यापारी कमी भावाने फुलांची विक्री करत आहेत. तर, दुसरीकडे मागणी असूनही व्यापाऱ्यांकडून शेवंतीच्या फुलांची कमी भावाने विक्री करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. फुलांना कमीत कमी 50 रुपये किलो भाव द्यावा, अन्यथा सर्व माल रस्त्यावर फेकू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने मार्केट यार्डातील फुल बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

-Ads-

नवरात्रीत जास्त भाव मिळत असल्याने दरवर्षी शेवंतीची मोठी आवक होत असते. यामध्ये, माळशिरस, भुलेश्‍वर, टेकवडी, कोंडे या गावांमधून शेवंतीची सर्वात फुले बाजारात दाखल होतात. गणेशोत्सवादरम्यान शेवंतीच्या फुलांना चांगली मागणी होती. त्यानंतर, पितृपक्ष काळात शेवंतीसह सर्व फुलांचे भाव कोसळले होते. त्यावेळी चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फुले राखून ठेवली होती. बाजारात आणण्यास सुरुवात केली. त्यानुसार, दोन ते तीन दिवसांपूर्वी मार्केट यार्डात शेवंतीच्या फुलांच्या प्रतिकिलोस 80 ते 100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवंतीला चांगला भाव मिळत असल्याने गुरूवारी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेवंतीची फुले विक्रीसाठी आणली. मागणी नसल्याने व्यापाऱ्यांनी फुलांची विक्री 20 रुपये प्रतिकिलोपर्यंत आणली. त्यामुळे संतप्त शेवंती उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांना प्रतिकिलोस 50 ते 60 रुपये भाव मिळावा, यासाठी आग्रह करत आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, काही काळानंतर माघार घेत 20 रुपये प्रतिकिलोदराने विक्रीस सहमती दर्शविली. दरम्यान, यासर्व घडामोडीत मोठ्या प्रमाणात माल शिल्लक राहिल्याने फेकून देण्यात आल्याचे चित्र बाजारात दिसून आले.

याबाबत बोलताना फुलांचे व्यापारी मोहन कुंजीर म्हणाले, घटस्थापनेच्या आणि त्याच्या आदल्या दिवशी शेवंतीच्या फुलांना मागणी होती. येथील फुलबाजारातून शहर, जिल्हा, राज्यासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून फुले विक्रीसाठी पाठविण्यात येतात. नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मोठी मागणी वाढली होती. यावेळी, बाजारात जवळपास 15 टन माल दाखल होत होता. मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात माल बाजारात दाखल होत असल्याने फुलांचे भाव तब्बल 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले होते. भावात अचानक मोठी वाढ होऊन ती परवडेनाशी झाल्याने परराज्यातून फुलांना मागणी घटली. यामध्ये, गुरूवारी बाजारात 50 टनांच्या आसपास शेवंतीच्या फुलांची आवक झाली. त्यातुलनेत मागणी नसल्याने फुलांच्या भाव घसरले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)