डायबेटीस मॅक्युलर एडिमाच्या व्यवस्थापनासाठी व दृष्टी निरोगी राखण्यासाठी 5 सुपर फूड्‌स

डॉ. नितीन प्रभूदेसाई 

भारतामधील मधुमेहींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, भारतात 72 दशलक्षांहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. डायबेटिक मॅक्‍युलर एडिमा (डीएमई) हा डायबेटिक रेटिनोथेरपीचा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे. नुकसानग्रस्त रक्तवाहिन्या सुजतात आणि रेटिनाच्या मॅक्‍युलामध्ये स्रवू लागतात तेव्हा सामान्य दृष्टीमध्ये दोष निर्माण होऊन हा विकार होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्याकडे पिढ्यानुपिढ्या डोळे चांगले राहावेत म्हणून गाजरे खा असे माता मुलांना सांगत आल्या आहेत. गाजरांमध्ये दृष्टीसाठी महत्त्वाचे असे काही घटक नक्कीच आहेत. मात्र, उत्तम दृष्टीसाठी केवळ गाजरे खाणे पुरेसे नाही हे आजच्या नव्या युगाच्या मॉम्सना समजले पाहिजे. डीएमईच्या व्यवस्थापनात काही आहारविषयक सवयी उपयुक्त ठरतात हे संशोधकांनी पुराव्यानिशी दाखवले आहे.

डीएमईच्या व्यवस्थापनासाठी तसेच दृष्टी निरोगी राखण्यासाठी 5 सुपर फूड्‌स 

ग्रीन टी: 
कॅन्सर, ऑस्टिओआर्थरायटिस (अस्थींचा संधीवात) आणि कार्डिओव्हस्क्‍युलर विकार यांसारखे अनेकविध आजार लांबवण्यात किंवा त्यांचा प्रतिबंध करण्यात ग्रीन टी हे पेय जादूई परिणाम करत आहे, असे लक्षात आले आहे. ग्रीन टीमधील पॉलिफेनॉल नावाचा घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास उपयुक्त ठरतो. 6 किंवा त्याहून अधिक कप ग्रीन टी घेतला असता, टाइप टू मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे जपानमधील एका अभ्यासातून पुढे आले आहे. मधुमेहाचे व्यवस्थापन प्रभावीरित्या झाल्यास डीएमईच्या व्यवस्थापनातही मदत होते.

क जीवनसत्वाने समृद्ध आहार: 
मॅक्‍युलर अध:पतनाच्या प्रक्रियेचा वेग कमी करण्यात क जीवनसत्व मदत करू शकते, याचे पुरावे मिळाले आहेत. बेरीज, संत्री आणि किवी खाणे हा क जीवनसत्व पुरेसे राखण्याचा एक चविष्ट मार्ग आहे. हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व व शक्तीशाली ऍण्टिऑक्‍सिडंट जोडणाऱ्या (कनेक्‍टिव) उती तयार करण्यात व त्यांचे प्रमाण योग्य राखण्यात शरीराला मदत करते. यामध्ये हाडे, त्वचा आणि विशेषत: डोळ्यातील रक्तवाहिन्यांचा समावेश आहे.

अ जीवनसत्वाने समृद्ध आहार: 
चांगल्या दृष्टीसाठी अ जीवनसत्व अत्यावश्‍यक आहे. रताळ्यांमध्ये बिटा-कॅरोटिन नावाचा एक कॅरोटेनॉइड असतो. यामुळे या कंदभाजीला गडद भगवा रंग येतो. बिटा-कॅरोटिनचे रूपांतर शरीर अ जीवनसत्वामध्ये करत असल्याने ते डोळ्यांचे आरोग्य वाढवण्यात मदत करते. अ जीवनसत्वाचे अन्य काही स्रोत म्हणजे अंडी, गाजरे आणि जर्दाळू.

मासे: 
हो, तुम्ही बरोबर तेच वाचले आहे! मासे हे पूर्वी समजले जात तसेच केवळ प्रथिनांचा समृद्ध स्रोत नाहीत, तर चरबीयुक्त मासे ड जीवनसत्वाचाही उत्तम स्रोत असतात. यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात तसेच दाह (जळजळ) कमी करण्यात मासे मोठी भूमिका बजावतात. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्‌सचे किमान 500 ग्रॅम्स दररोज घेणाऱ्यांमध्ये डायबेटिक रेटिनोथेरपीचा धोका कमी झाल्याचे 2016 साली स्पेनमध्ये झालेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे.

ल्युटीन समृद्ध अन्नपदार्थ: 
केल, पालक, रोमाइन लेट्युस तसेच कोलार्ड (कोबीचा प्रकार) यांसारख्या गडद रंगांच्या तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्ये आणि मक्‍यामध्ये ल्युटीन आणि झिक्‍झॅंथिनची पोषके मोठ्या प्रमाणात असतात. ही पोषके डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. हे दोन्ही घटक मॅक्‍युलामध्ये मोठ्या प्रमाणात एकवटलेले आढळतात. मॅक्‍युला हा रेटिनाचा केंद्रीय भाग असून, तपशीलवार केंद्रीय दृष्टीसाठी जबाबदार आहे. तुमच्या रेटिनातील पेशींच्या संरक्षणात हे ऍण्टिऑक्‍सिडंट्‌स मदत करतात.

मधुमेहाशी निगडित अनेकविध जीवनशैलीविषयक धोक्‍यांसोबतच रुग्णांनी रेटिनाविषयक आजारांबद्दल दक्ष राहिले पाहिजे आणि त्यांची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळेत निदान व उपचार करून घेतले पाहिजेत. मधुमेहींना दर सहा महिन्यांनी नेत्रविकारतज्ज्ञ/रेटिनोलॉजिस्टना भेटण्याचा सल्ला दिला जातो. कारण डायबेटिक रेटिनोपथी होण्याचा धोका त्यांना अधिक असतो. डीएमईचे निदान वेळेत झाल्यास अंधत्व टाळले जाण्याची शक्‍यता वाढते.

याची काही सामान्य लक्षणे म्हणजे अंधुक किंवा अस्पष्ट किंवा विपर्यस्त दृष्टी, रंगांतील फरक ओळखण्याची क्षमता कमी होणे, कमी झालेला कॉंट्रास्ट किंवा रंगसंवेदनशीलता, दृष्टीत काळे ठिपके जाणवणे, सरळ रेषा वाकड्या किंवा तिरक्‍या दिसणे आणि दूर अंतरावरील वस्तू दिसण्यात अडचणी येणे. ही लक्षणे वेळीच लक्षात आल्यास आजाराचे निदान वेळेत होते आणि तज्ज्ञांच्या सल्ल्‌यानुसार दर्जेदार उपचार घेतल्यास डीएमईचे व्यवस्थापन चांगल्यारितीने करता येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)