शहरात 5 ठिकाणी मिळणार ऑनलाइन “पीयूसी’

पुणे – नव्या नियमानुसार वाहनाची “पीयूसी’ अर्थात “पोल्यूशन अंडर कंट्रोल’ प्रमाणपत्र आता ऑनलाइन मिळणार आहे. त्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रक्रियेला काही वेळ जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शहरातील पाच ठिकाणी ही ऑनलाइन यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.

केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार “पीयूसी’ यंत्रणा ऑनलाइन करण्यात आली आहे. दि.1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आरटीओ कार्यालयाने गुरुवारी (दि. 28) शहरातील पीयूसी केंद्र संचालकांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या. शहरातील वाहनसंख्या 38 लाखांवर गेली असून यात जुन्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी, या वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण जास्त असून प्रदूषण पातळी नियंत्रणात आहे, की नाही यासाठी “पीयूसी’ तपासणी केली जाते. या चाचणीमुळे वाहनाद्वारे होणारे कार्बन मोनॉक्‍साईड, हायड्रोकार्बनचे प्रमाण तपासले जाते. आजवर ही प्रक्रिया “मॅन्युअली’ होती.

मात्र, नव्या नियमानुसार ही यंत्रणा ऑनलाइन होणार असून तपासणी केलेल्या वाहनांचे छायाचित्रही “अपलोड’ करावे लागणार आहे. यामुळे केंद्र संचालकाला इंटरनेट, कॅमेरे, ई-उपकरणे खरेदी करुन त्याचे नियोजन करावे लागणार आहे. यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून ते आरटीओशी “कनेक्‍ट’ करावे लागणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असून याला काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे सुरूवातीला शहरातील पाच ठिकाणी “पीयूसी’ प्रक्रिया ऑनलाईन करुन यानंतर उर्वरित ठिकाणी यंत्रणा सुरू केली जाईल, अशी माहिती आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)